Sunday, October 12, 2025

मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे पर्यटक तरुणी ४० फूट खोल दरीत कोसळली

मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे पर्यटक तरुणी ४० फूट खोल दरीत कोसळली

राजगड : राजगडावर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर अचानक मधमाश्यांनी हल्ला केला. त्यामुळे पर्यटकांची पळापळ झाली. संजीवनी माची परिसरात भ्रमंतीसाठी आलेल्या अंजली पाटील (वय 24) या युवतीवर हल्ला होताच ती घाबरून बचावाच्या प्रयत्नात सुमारे ४० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातामुळे तिला मणक्यामध्ये फ्रॅक्चर झाले व हालचाल करणे अशक्य झाले.

या घटनेची माहिती मिळतात, वेल्हे पोलीस स्टेशनच्या माध्यमातून वेल्हा-हवेली आपत्ती व्यवस्थापनाने बचाव मोहिम सुरू केली. किल्ल्याचा परिसर दुर्गम व उताराचा असल्याने काळोखात ८-९ तासांपर्यंत धाडसी प्रयत्न करून अंजलीला सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. त्यानंतर स्ट्रेचरच्या सहाय्याने तिला किल्ल्याच्या पायथ्याशी आणण्यात आले. तिला प्राथमिक उपचारासाठी वेल्हे आरोग्य केंद्रात नेऊन तिथे तिच्यावर उपचार करण्यात आले. नंतर पुढील उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात हलवण्यात आले. सुदैवाने, तिची प्रकृती आता स्थिर आहे.

धाडसी रेस्क्यू मोहिमेत तानाजी भोसले, वैभव भोसले, मनोज शिंदे, आकाश झोंबाडे, संजय चोरघे, संतोष जाधव, उत्तम पिसाळ, विक्रम बिरामणे आणि अनिल रेणुसे या सदस्यांनी सहभाग घेतला.

ट्रेकिंग करताना कशा प्रकारे सावधगिरी बाळगावी त्या संदर्भात रेस्क्यू टीमने दिलेल्या सूचना

  • योग्य पादत्राणे, पाणी व प्राथमिक उपचार साहित्य सोबत ठेवा.
  • मधमाश्या, साप किंवा अन्य वन्यजीव दिसल्यास घाबरून न जाता शांत राहा व सुरक्षित ठिकाणी जा.
  • अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीत त्वरित वेल्हा-हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमशी संपर्क साधा.
  • सुरक्षिततेसाठी नियम पाळा आणि सावध रहा.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >