Saturday, October 11, 2025

अजय आणि विजय

अजय आणि विजय

कथा : रमेश तांबे

एक होता अजय अन् दुसरा होता विजय दोघे होते फारच उनाड कुणावरही पडायची त्यांची धाड दिसला कुणी कर टवाळी आला कुणी मार टपली कुणाच्या दप्तरातले पुस्तक लपव कुणाचा डबा अलगद पळव! शेवटच्या बाकावर दोघे बसायचे.  चित्र विचित्र आवाज काढायचे वर्गात कधी विमान उडव बेंच उगाच जोरात बडव सगळे झाले त्रस्त त्रस्त सरांची वाढली वर्गावर गस्त पण दोघेही काही ऐकना उच्छाद त्यांचा थांबेना

मग मुलांची भरली एक मिटिंग पण त्यातच झाली मोठी चिटिंग अजयच झाला मिटिंगचा मुख्य हेच होते मोठे दुःख त्याने केला विजयचा सत्कार विजयने काढले भाषणातून फुत्कार म्हणाला आम्हीच आहोत इथले दादा तुम्ही आमचे गुलाम सदा आमच्या बाजूने या रे सारे नाहीतर व्हाल बळीचे बकरे सगळीच मुले खूप घाबरली भीतीने आपली गप्पच बसली सुरूच राहिला दोघांचा दंगा कोणच घेईना त्यांच्याशी पंगा दिवसा मागून दिवस गेले दिवस महिने वर्ष सरले मग एक दिवस असा उजाडला. अजय विजयला धडा मिळाला शाळेत एकदा जादूगार आला अजय विजयला जोर चढला पळवली त्यांनी जादूची काठी जादुगाराची झाली अडचण मोठी त्याला आला खूपच राग गरगर त्याने फिरवला हात ज्यांनी चोरली माझी काठी डोक्यावरचे केस त्यांचे गळतील मग काय एकदम नवलच घडले अजय विजय टकले बनले खो खो हसली मुले सारी अजय विजयची चांगलीच जिरली तेवढ्यात शाळेची घंटा वाजली जादूगार निघाला आपल्या घरी अजय विजयला फुटला घाम विनवणी केली जादूगरा थांब चुकलो आम्ही पळवली काठी आपली गैरसोय झाली मोठी आता सगळी मुलं गोळा झाली टकल्यांना बघून झाली हळवी मुले म्हणाली अरे जादूगरा अजय विजयला माफ करा.

दोघेही आहेत मित्र आमचे देऊन टाक केस पूर्वीचे ऐकून मागणी साऱ्या मुलांची जादूगाराच्या डोळ्यांत आले पाणी तो म्हणाला अजय विजय बघा या मुलांचा मोठेपणा तुम्ही सगळ्यांचा छळ करता केवढा साऱ्यांना त्रास देतातरीही ते विनंती अजय विजयचे केस द्या करतात ऐकून जादूगाराचे खडे बोल दोघांना समजले मित्रांचे मोल दोघेही म्हणाले माफ करा मित्रांनो खरेच आम्ही खूप चुकलो यापुढे कुणाला नाही छळणार सगळ्यांशी आम्ही प्रेमाने वागणार मग जादूगाराने फिरवला हवेत हात छू मंतर जादू मंतर तोंडाने बोलत मग काय सांगू, नवलच घडले अजय विजयचे केस परत आले सगळ्यांना मोठा आनंद झाला मित्रांचा मेळा हसत हसत घरी गेला!

Comments
Add Comment