Saturday, October 11, 2025

देशाला प्रशासकीय नेतृत्व देणाऱ्या संस्थेची यशस्वी शताब्दी!

देशाला प्रशासकीय नेतृत्व देणाऱ्या संस्थेची यशस्वी शताब्दी!

प्रा. नंदकुमार काकिर्डे

आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य असताना त्यांनी स्थापन केलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाला (युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन- यूपीएससी) याच सप्ताहात १०० वर्षे पूर्ण झाली. देशाला प्रशासकीय नेतृत्व देण्याचे मोलाचे काम ही संस्था यशस्वीपणे करत आहे. शताब्दीनिमित्त  आयोगाच्या कामगिरीचा धावता आढावा.

केंद्र सरकार किंवा  विविध राज्यांचे प्रशासन अत्यंत कणखरपणे चालवण्यासाठी  शंभर वर्षांपूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना झाली. भारतातील नागरी सेवा भरतीचा  आधारस्तंभ म्हणून या संस्थेकडे पाहिले जाते. हा आयोग निर्माण झाल्यापासून आजतागायत गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड करण्यासाठी अत्यंत कठोर पद्धतीने लेखी व तोंडी परीक्षा घेते. त्यामध्ये उत्तीर्ण होणारे सक्षम उमेदवारच नागरी सेवा क्षेत्रामध्ये सामील होऊन देशाचे किंवा राज्यांचे प्रशासकीय नेतृत्व यशस्वीपणे करत आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या  आयोगाच्या परीक्षा प्रक्रियेचे,  त्यांच्या निवड निकषांचे प्रमाणीकरण केले असल्याने सर्व इच्छुक उमेदवारांना अत्यंत समान संधी देण्याचे महत्त्वाचे काम हा आयोग करतो. एवढेच नाही तर विविध शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या प्रतिभावान व्यक्तींना  आकर्षित करण्याचे  काम या आयोगातर्फे वर्षानुवर्ष सुरू आहे.

या आयोगातर्फे निवड करण्यासाठी दोन वेगवेगळ्या स्तरावरील परीक्षा घेतल्या जातात.  दरवर्षी साधारणपणे १३ ते १४ लाख उमेदवार  देशभरातून प्राथमिक परीक्षा देतात.त्यातील साधारणपणे केवळ १४ ते १५ हजार उमेदवार अंतिम परीक्षेसाठी उत्तीर्ण होतात आणि त्यातून साधारणपणे १ हजार उमेदवार केंद्र सरकारच्या प्रशासकीय सेवेमध्ये निवडले जातात. साधारणपणे प्राथमिक परीक्षेतले यश  २५ टक्क्यांच्या  घरात आहे. त्यातील १५ टक्के उमेदवार अंतिम परीक्षेसाठी निवडले जातात. यावरून या परीक्षेतील काठिण्याची पातळी लक्षात येऊ शकते. तसेच सर्वसाधारण गट, ओबीसी, अनुसूचित जाती, जमाती, आर्थिक मागास अशा विविध समाज  घटकांमधून अंतिम उमेदवार निवडले जातात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विविध घटकांसाठी वयोमर्यादा निश्चित केलेली असून  २१ ते ३७ वयोगटातील उमेदवार सेवेसाठी  निवडले जातात. सैन्यात काम केलेल्या किंवा जम्मू-काश्मीरमधील व्यक्तींना जादा  पाच वर्षांची सवलत  मिळते. एकंदरीत ही सर्व प्रक्रिया खूप गुंतागुंतीची, किचकट स्वरूपाची आहे. त्यात कोणताही राजकीय किंवा बाह्य हस्तक्षेप होऊ न देता पारदर्शकपणे निवड करण्यात आयोग आजवर यशस्वी झालेला आहे. आजच्या घडीला केंद्र व विविध राज्ये यांच्यात साडेपाच हजारपेक्षा जास्त सनदी अधिकारी कार्यरत आहेत. तसेच दीड हजार अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत.

ब्रिटिशांच्या कारकिर्दीमध्ये १ ऑक्टोबर १९२६रोजी या केंद्रीय आयोगाची स्थापना झाली. नागरी सेवांच्या अधिकाऱ्यांची भरती, पदोन्नती आणि या संपूर्ण यंत्रणेला प्रशासनाला शिस्त लावण्याचे महत्त्वाचे काम हा आयोग  करतो. त्यामुळे या आयोगाचा गेल्या १०० वर्षांचा प्रवास हा केवळ एक संस्थात्मक इतिहास नाही तर  निःपक्षता, विश्वास व प्रशासनातील सचोटी यावर आढळ विश्वासाचा पुरावा म्हणून या आयोगाचा उल्लेख करावा लागेल. इंग्रजांच्या काळामध्ये १९१९ मध्ये भारत सरकारचा कायदा तयार करण्यात आला होता व त्यावेळी या संस्थेची तरतूद करण्यात आली होती. १९२४ मध्ये त्यावेळच्या ली कमिशनने शिफारस केल्यानुसार केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. जगभरात जेथे जेथे लोकशाही संस्था अस्तित्वात असतील तेथे जनतेला कार्यक्षम नागरी सेवा सुरक्षितपणे देण्यासाठी व त्याच वेळेला कोणत्याही राजकीय किंवा वैयक्तिक प्रभावांपासून संरक्षण देऊन एक स्थिर व सुरक्षित प्रशासन देण्याचे काम या आयोगाने तब्बल १०० वर्षे यशस्वीपणे केले आहे. प्रारंभीच्या काळात इंग्लंडमधील सर रॉस बार्कर यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांच्या वसाहतवादी राजवटीत अशा प्रशासकीय नेतृत्वाचा प्रयोग काही मर्यादित अधिकारांसह करण्यात आला. त्यानंतर १९३५मध्ये याला संघराज्यात्मक स्वरूप देण्यात येऊन केंद्रीय लोकसेवा आयोग असे नाव देण्यात आले. २६ जानेवारी १९५०मध्ये संसदेने राज्यघटनेचा स्वीकार केल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणून त्यास मान्यता देण्यात आली. नागरी सेवांपासून अभियांत्रिकी, वन, वैद्यकीय व सांख्यिकी अशा विविध स्तरातील सेवांसाठी गुणवत्तापूर्ण परीक्षा घेऊन अधिकाऱ्यांची भरती करणारी ही प्रमुख संस्था बनलेली आहे.

गेल्या ७५ वर्षांमध्ये या आयोगाच्या कार्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील प्रशासकीय सेवेसाठी सर्वोत्तम प्रतिभेचे उमेदवार निवडणे हा या आयोगाचा अधिकार आजही कायम आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यश किंवा अपयश हे केवळ गुणवत्तेवर अवलंबून असते याची खात्री सातत्याने आयोगातर्फे दिली जाते. या आयोगाने गेल्या १०० वर्षांमध्ये निर्माण केलेला विश्वास हा अपघाती नाही; परंतु त्यांच्या संपूर्ण निवड प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, मूल्यांकनातील नि:पक्षता आणि कोणत्याही गैरव्यवहाराविरुद्ध तडजोड न करता कार्य नेटाने पुढे चालवणे यासाठी संस्थात्मक कष्ट  आयोगाने आजवर घेतलेले आहेत. देशातील सत्ताधारी राजकीय पक्षांचा होणारा हस्तक्षेप  कटाक्षाने दूर ठेवणे किंवा सर्व प्रकारच्या बाह्य दबावांपासून निवड प्रक्रियेचे संपूर्ण संरक्षण करणे, त्यामध्ये गोपनीयता राखणे आणि यशस्वी होणारा प्रत्येक उमेदवार हा सर्वात सक्षम आहे किंवा कसे याची खात्री करणे हे आयोगाचे खऱ्या अर्थाने यश आहे.

नि:पक्षता याचा अर्थ शहरी किंवा ग्रामीण विशेष अधिकार प्राप्त किंवा वंचित, इंग्रजीमध्ये अस्खलितपणे बोलता किंवा लिहिता येणारे किंवा  न येणारे, एवढेच नाही तर प्रत्येक प्रकारची पार्श्वभूमी असलेल्या सर्व उमेदवारांना समान संधी देणे हे  आयोगाचे खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर नोंद घ्यावी असे कार्य आहे. मुळामध्ये एक गोष्ट मान्य केली पाहिजे भारतामध्ये  आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक असमानता आहे. त्यामुळे या परीक्षा देणाऱ्या सर्व उमेदवारांना समान सार्वत्रिक संधी देण्याचे महत्त्वाचे अभिमानास्पद काम  आयोग करत आहे. कोणत्याही प्रकारची आसक्ती न बाळगता आपले कर्तव्य जसे केले पाहिजे तसे करत राहण्याचे व्रत हा आयोग प्रत्येक यशस्वी उमेदवाराला देत असतो. त्यामुळे जनहितासाठीच प्रशासकीय सेवा करण्याचे ब्रीदवाक्य  प्रत्येक प्रशासकीय नेत्याचे असते. प्रशासकीय सेवा ही समर्पण चिकाटी व राष्ट्रसेवा यांचे स्वप्न पूर्ण करणारी आहे. प्रारंभीच्या काही दशकांमध्ये केवळ उच्चभ्रू शहरांमधून या परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण मोठे होते; परंतु गेल्या काही दशकांमध्ये देशभरातील अत्यंत दुर्गम आणि वंचित प्रदेशातील तरुणांना या प्रशासनामध्ये नेतृत्व करण्याची संधी आजवर लाभलेली आहे.

जगातील सर्वात मोठी आणि सर्वात अत्याधुनिक स्पर्धात्मक परीक्षा नागरी सेवा परीक्षा आणि वर्षानुवर्षे उल्लेखनीय अचूकता आणि सातत्यपूर्णता सातत्यपूर्णतेने आयोजन करण्यामध्ये या आयोगाला यश लाभलेले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये दिव्यांग उमेदवारांनाही या परीक्षांमध्ये संधी देत दिली जात असल्याने त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करावी लागते व त्यामध्येही आयोग निश्चितपणे आवश्यक ती यंत्रणा कार्यरत करते. या संस्थेच्या यशामध्ये हजारो नायकांचा प्रमुख वाटा आहे. कोणत्याही प्रकारची ओळख किंवा प्रसिद्धी मिळवण्याची अपेक्षा न करता अशी शेकडो अधिकारी मंडळी आयोगाला समर्पणाने सेवा देत आहेत. त्यामुळेच शताब्दी साजरी करणाऱ्या आयोगाने आजवर केलेल्या अतुलनीय, ऐतिहासिक कामगिरीसाठी मनापासून आभार, धन्यवाद व पुढील शताब्दीसाठी शुभेच्छा.

Comments
Add Comment