Saturday, October 11, 2025

सावित्री जिंदाल देशातील सर्वात श्रीमंत महिला; फोर्ब्स इंडियाची यादी जाहीर

सावित्री जिंदाल देशातील सर्वात श्रीमंत महिला; फोर्ब्स इंडियाची यादी जाहीर

नवी दिल्ली : हरियाणा हिसारच्या आमदार आणि ओपी जिंदाल ग्रुपच्या प्रमुख सावित्री जिंदाल या फोर्ब्स इंडियाच्या २०२५ च्या श्रीमंत व्यक्तिंच्या यादीत भारतातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत. ३९.६ अब्ज डॉलर्सच्या एकूण संपत्तीसह, मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यानंतर त्यांचा भारतातील सर्वात श्रीमंतांमध्ये क्रमांक लागतो. नुकतेच ही यादी जाहीर करण्यात आली. सावित्री जिंदाल आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये ४८ व्या क्रमांकावर आहेत. एप्रिलच्या सुरुवातीला, फोर्ब्सकडून अब्जाधीशांची (ज्यांची एकूण संपत्ती किमान १ अब्ज अमेरिकन डॉलर्स किंवा८,३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे) यादी २०२५ जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी सावित्री जिंदाल यांची एकूण संपत्ती ३५.५ अब्ज डॉलर्स होती. म्हणजेच, ६ महिन्यांत सावित्री जिंदाल यांच्या संपत्तीत ४.१ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.

सावित्री जिंदाल यांच्या अध्यक्षतेखाली जिंदाल ग्रुपचे साम्राज्य स्टील, वीज, सिमेंट आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात पसरलेले आहे. कंपनीची स्थापना त्यांचे दिवंगत पती ओम प्रकाश जिंदाल यांनी केली होती, ज्यांचे २००५ मध्ये हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर, व्यवसाय विभागला गेला. त्यांचा मुलगा सज्जन जिंदाल मुंबईस्थित जेएसडब्ल्यू स्टील, जेएसडब्ल्यू सिमेंट आणि जेएसडब्ल्यू पेंट्सचे प्रमुख आहेत. २०२३ मध्ये त्यांनी जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर सार्वजनिक केले. २०२४ मध्ये, त्यांनी चीनच्या एसएआयसी मोटरची उपकंपनी असलेल्या एमजी मोटर इंडियामध्ये ३५ टक्के हिस्सा विकत घेऊन इलेक्ट्रिक वाहनांमध्ये विस्तार केला. नवीन जिंदाल, जिंदाल दिल्लीत स्टील अँड पॉवरचे व्यवस्थापन करतात.

Comments
Add Comment