
समुपदेशन दरम्यान अनेक एकल महिलांचे प्रश्न अभ्यासले जातात. त्यावर मार्गदर्शन केले जाते. अनेकदा वयस्कर महिला ज्यांना आपण सिनियर सिटीझन म्हणू शकतो. या एकट्या राहतात. पतीचे आधीच निधन झाले असल्यास, घटस्फोट झाला असल्यास, अविवाहित असल्यामुळे या महिलांना समवयस्क जोडीदार नसतो. मुलं-मुली असले तरी ते नोकरी, व्यवसायनिमित्त, लग्न झाल्यामुळे दुसऱ्या ठिकाणी वास्तव्याला असतात. या सर्व परिस्थितीमध्ये उतार वयात एकटी राहणारी महिला अनेक आव्हानांना सामोरं जात असते. अशा महिला आर्थिकदृष्टीने संपन्न असल्या किंवा नसल्या तरीही त्यांना जाणवणारे त्रास हे सारखेच असतात. आर्थिक स्वावलंबी महिला सुद्धा फक्त पैसे आहेत म्हणून उतरत्या वयात सुखी राहीलच असे नाही. एकट्या राहणाऱ्या वयस्कर महिलांच्या समस्या आणि त्यांच्या स्वभावाविषयी माहिती, त्यांच्यासाठी उपाययोजना याबद्दलची चर्चा आपण या लेखातून करणार आहोत.
समाजात अनेक महिलांना विविध कारणांमुळे उतारवयात एकटं राहतांना आपण बघतोय आपल्या लक्षात येते की त्यांना अनेक शारीरिक आणि मानसिक आव्हानांना तोंड द्यावं लागतं. शारीरिक समस्या हा सर्वात मोठा प्रश्न त्यांना त्रासदायक ठरतो. वाढत्या वयानुसार विविध आजार होतात. त्यात, एकटेपणामुळं वेळेवर औषधं घेणं, डॉक्टरांकडे जाणं किंवा गरजेच्या वेळी मदतीसाठी कोणी नसणं, यांसारख्या अडचणी येतात. घरकाम करतांना उतार वयातील महिलांना मदतीची गरज भासते. घरातली तथा बाहेरील काही कामं करणं अवघड होतं, ज्यामुळे त्यांना मदतनीस नेमावा लागतो. घरासाठी कामवाली व्यक्ती विश्वासू मिळणं महत्त्वाचं असतं. दैनंदिन नियोजन सांभाळून वेळेवर कामावर येणे अशी सर्वांगीण व्यक्ती मदतनीस म्हणून मिळणे उतार वयात आवश्यक असते. आपल्याकडे बहुतांश वेळा घरकामाला कायमस्वरूपी मदतनीस मिळणे अवघड असते, अशी व्यक्ती मिळाल्यास ती फक्त पैसे कमवण्यासाठी व्यावसायिक पद्धतीने काम करते त्यात आपुलकी, प्रेम नसते त्यामुळे ज्येष्ठ महिलांना सेवा मिळू शकते पण त्यात प्रेमाचा अभाव असतो. सुरक्षिततेची कमतरता या महिलांमध्ये पाहायला मिळतो. घरात एकटं राहत असल्यामुळे त्यांच्या बाबतीत चोरी किंवा इतर गुन्हे घडण्याची भीती असते. एकटेपणा हा वृद्ध महिलांसमोरील सर्वात मोठा प्रश्न आहे. कुटुंबीयांपासून किंवा मित्र-मैत्रिणींपासून दूर राहिल्यामुळे त्यांना एकटेपणा वाटतो. उदासीनता आणि नैराश्य त्यांना जास्त प्रमाणात जाणवते. सततचा एकटेपणा, आरोग्याच्या समस्या आणि भविष्याची चिंता यामुळे त्यांना नैराश्य येऊ शकतं.
आर्थिक नियोजन, सुरक्षा, आरोग्याची काळजी आणि सामाजिक दबाव यांमुळे त्यांच्यावर सतत मानसिक ताण येतो. त्यातून त्यांचे स्वभाव बदलतात. एकट्या राहणाऱ्या वृद्ध महिलांच्या स्वभावावर त्यांच्या जीवनशैलीचा आणि अनुभवांचा खूप मोठा परिणाम होतो. त्यांच्या वागण्यात आणि सवयींमध्ये काही विशिष्ट गोष्टी दिसून येतात. संवेदनशीलता म्हणजेच त्या खूप हळव्या असतात. त्यांना मदतीची किंवा सहानुभूतीची अपेक्षा असते. कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करणं, भविष्याची चिंता, जुन्या आठवणी, घडून गेलेल्या गोष्टींवर पच्छाताप, मन मोकळ करायला कोणी हक्काचे माणूस जवळ नसणे यामुळे त्या सतत विचार करतात. सततच्या असुरक्षिततेमुळे त्या लवकर कुणावरही विश्वास ठेवत नाही. त्यांच्या वागण्यात भीती आणि चिंता दिसून येते. त्यांना सतत असे वाटतं राहते की लोकं आपला गैरफायदा घेतील. या महिलांच्या आयुष्यात परिस्थितीनुसार फार मोठे बदल झाल्यामुळे त्या आपल्या जुन्या सवयी आणि जीवनशैलीला घट्ट धरून ठेवतात. त्यांना नवीन गोष्टी लवकर स्वीकारता येत नाहीत. अशा महिलांच्या स्वभावामागे मानसशास्त्रीय कारणं अभ्यासले असता लक्षात येते की, त्यांना सुरक्षिततेची गरज आहे.
उतारवयात शारीरिक आणि भावनिक असुरक्षितता वाढते. त्यामुळे त्या स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी कमी लोकांशी संपर्क ठेवतात, स्वतःच्या कोषात राहतात. त्यामुळे या महिलांच्या आयुष्यात सामाजिक दुरावा निर्माण होतो. सामाजिक कार्यक्रमांमध्ये किंवा कुटुंबात, इतर नातेवाइकांमध्ये त्यांना महत्त्वाचं स्थान मिळत नाही किंवा त्या दुर्लक्षित राहतात त्यामुळे त्या लोकांपासून दूर राहणं पसंत करतात. लोकं आपल्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात असे त्यांना वाटतं असते. आपण आपल्या मनाप्रमाणे आयुष्य जगू शकत नाही ही सल त्यांच्या मनात कायम असते. वय झालेल्या परंतु एकटे राहणाऱ्या महिलांच्या प्रश्नांवर उपाययोजना जाणून घेणे गरजेचे आहे. एकट्या राहणाऱ्या महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी काही उपाय करता येतात.
सामाजिक आणि कौटुंबिक आधार मिळण्यासाठी कुटुंबीयांनी त्यांच्यासोबत नियमित संपर्क ठेवावा, वेळोवेळी त्यांना भेटायला जावं, फोनवर त्यांच्याशी बोलत राहावं यामुळे त्यांना एकटेपणा जाणवणार नाही. शारीरिक आरोग्याइतकेच महत्त्वाचे आहे मानसिक आरोग्य. मानसिक आरोग्य जपण्यासाठी समुपदेशन मदत करू शकते. त्यामुळे त्यांना योग्य वेळी समुपदेशकाची मदत मिळवून द्यावी. सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेणे या महिलांसाठी उपयुक्त आहे. अशा महिलांना जवळपासच्या ज्येष्ठ नागरिक संघ, धार्मिक गट, मंडळ, भिशी किंवा इतर सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावं. यामुळे त्यांना नवीन मित्र-मैत्रिणी मिळतील, समवयस्क लोकांशी त्या सुख-दुःख वाटू शकतील. नियमित आर्थिक मदत मिळत राहणे, पैसा उपलब्ध असणे या वयातील प्रमुख गरज असते. त्यामुळे आर्थिक नियोजनाची माहिती त्यांना द्यावी किंवा कुटुंबाने आवश्यक ती आर्थिक मदत करावी.
आकडेवारीमध्ये जाणून घेतले असता, साधारणपणे एका शहरात एकट्या राहणाऱ्या वयस्कर महिलांची संख्या किंवा टक्केवारी खूप भिन्न असू शकते आणि ती शहरावर, देशावर आणि वयस्कर महिलेच्या वयोगटावर अवलंबून असते. तरीही, जगभरातील आणि विशेषतः विकसित देशांमधील सामान्य कल पाहिला असता, एकट्या राहणाऱ्या वयस्कर लोकांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. सामान्यतः एकट्या राहणाऱ्या वयस्कर लोकांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या लक्षणीयरीत्या जास्त असते. कारण म्हणजे स्त्रियांचे आयुष्य पुरुषांपेक्षा जास्त आहे. उतार वयात घटस्फोट झाल्यावर, पतीचे निधन झाल्यानंतर त्यांचे पुनर्विवाह होण्याची शक्यता कमी असणे. वय वाढत जाईल तसतसे एकट्या राहणाऱ्या महिलांची टक्केवारी खूप वाढते. उदाहरणार्थ (अमेरिकेतील आकडेवारीनुसार) ७५ किंवा त्याहून अधिक वयाच्या सुमारे ४२% ते ५०% महिला एकट्या राहतात, तर ६५ ते ७४ वयोगटातील सुमारे २७% महिला एकट्या राहतात. भारतीय शहरांमध्ये किंवा शहरी भागांमध्ये एकट्या राहणाऱ्या वयस्कर व्यक्तींचे प्रमाण ग्रामीण भागापेक्षा जास्त असते. एकूण वयस्कर लोकसंख्येपैकी प्रमाण पाहिले असता, काही शहरांमध्ये, ६५ वर्षांवरील किंवा त्याहून अधिक वयाच्या एकूण वयस्कर लोकसंख्येपैकी एकट्या राहणाऱ्या महिलांचे प्रमाण ६५% ते ७०% पेक्षा जास्त असू शकते.
या समस्यांवर मात करण्यासाठी कुटुंबीय, समाज आणि सरकारने एकत्र काम करणं खूप महत्त्वाचं आहे. अशा महिलांना योग्य भावनिक मानसिक आधार आणि मदत मिळाली, तर त्यांचं आयुष्य अधिक सुखी होऊ शकतं. कुटुंबापासून महिलांना एकटं अथवा लांब राहावं लागणार नाही याच नियोजन घरातील व्यक्तींनी पहिल्यापासूनच करावे. महिला जर पहिल्यापासून नोकरी, व्यवसाय करणारी असेल तर तिने स्वतःचे सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य, त्याबद्दलचे नियोजन आधीच करावे. शक्यतो नोकरी करणाऱ्या महिलांना सेवा निवृत्तीनंतर एकदम रिकामपण येते, दिनचर्या बदलते आणि त्यातून त्या एकट्या असतील तर जास्तच त्रासदायक ठरते. विविध सामाजिक संस्था, संघटना, समूह यांनी मोठ्या प्रमाणात कार्यरत होऊन ज्येष्ठ महिलांना विरंगुळा म्हणून, वेगवेगळे उपक्रम, समुपदेशन कार्यक्रम राबवावेत. वयोवृद्ध महिलांना कोठेही घराबाहेर पडायचे असल्यास त्यांना सोबत करण्यासाठी, त्या कामात मदत करण्यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. वेळोवेळी या महिलांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, आर्थिक दृष्टीने सक्षम नसलेल्या महिलांसाठी आर्थिक मदत करणारी, त्यांना सुरक्षा पुरवणारी शासकीय यंत्रणा, योजना नियमित राबवणे गरजेचे आहे. अशा महिलांसाठी समाजाने, शेजारील लोकांनी, नातेवाइकांनी एकत्रित येऊन मदत करणे हे पण पर्याय असू शकतात.
- मीनाक्षी जगदाळे