Saturday, October 11, 2025

पीएमजीपीच्या १७ अति धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनाचा मुहूर्त निश्चित

पीएमजीपीच्या १७ अति धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनाचा मुहूर्त निश्चित

डिसेंबरनंतर होणार कामांना सुरुवात

मुंबई (प्रतिनिधी) : गेली अनेक वर्ष रखडलेल्या अंधेरी (पूर्व) येथील पीएमजीपीच्या १७ अति धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनाचा मुहूर्त निश्चित करण्यात आला. २७ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर तसेच म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्यात पार पडलेल्या बैठकीत येत्या डिसेंबरनंतर पुनर्वसनाच्या कामांना सुरुवात करण्याचा तसेच रहिवाशांना तीन वर्षांचे भाडे एकत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नाबाबत खासदार वायकर यांनी उपाध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समवेत बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला मुंबई बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, सह मुख्याधिकारी वंदना सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता राठोड, कार्यकारी अभियंता विहार बोडके आदी अधिकारी विभागप्रमुख तसेच माजी नगरसेवक स्वप्नील टेंबवलकर, राजू पेडणेकर, सदानंद परब, संजय पवार, राजुल पटेल, प्रतिमा खोपडे, लोचना चव्हाण आदी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

पूनम नगर पीएमजीपी येथील रहिवाशांसाठी खरेदी विक्रीची कनेक्टिविटीचा विशेष कॅम्प लावण्यात येणार आहे. सोमवारपासून हा कॅम्प लावण्यात येणार आहे. येथील सदनिका खरेदी केलेल्या व्यक्तीचे निधन झाले असेल त्यांच्या वारसदारांकडून सक्सेशन प्रमाणपत्र प्राप्त होत नाही तोपर्यंत मृत व्यक्तीच्या नावे खोली राखीव ठेवण्यात येईल. कुटुंबांनी मान्यता दिल्यावर भाड्याची वाटणी समान करण्यात येईल. या सर्व कामांसाठी एक समन्वय समिती गठीत करण्यात येणार. या समितीची बैठक महिन्यातून एकदा घेण्यात येणार. पुनर्विकासाचे काम सुरु करण्यापूर्वी फेडरेशन यांच्यासोबत एक बैठक म्हाडाने घ्यावी, अशी विनंती रहिवाशांकडून यावेळी करण्यात आली. म्हाडा कॉलनी, अंधेरी (पूर्व) येथील कोकण नगर जवळील म्हाडाच्या भूखंडावर विकासकाकडून करण्यात येणारे अतिक्रमण रोखण्यासाठी याठिकाणी तत्काळ संरक्षण भिंत बांधण्याच्या सूचना म्हाडाचे उपाध्यक्ष यांनी संबंधित अधिकारी यांना दिल्या. हा प्लॉट पोलिसांसाठी राखीव असल्याने या ठिकाणी पोलीस स्टेशन व पोलीस वसाहत बांधण्याचा म्हाडाचा विचार आहे.

Comments
Add Comment