Saturday, October 11, 2025

फुलवंतीला झालं एक वर्ष; प्राजक्ता काय म्हणतेय पहा...

फुलवंतीला झालं एक वर्ष; प्राजक्ता काय म्हणतेय पहा...

मुंबई : उत्कृष्ट कथानक असलेला फुलवंती हा संगीतबद्ध चित्रपट २०२४ मध्ये आला होता. आज त्याला एक वर्ष पूर्ण झालं. यानिमित्त फुलवंतीने म्हणजेच प्राजक्ता माळीने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

मराठी इंडस्ट्रीमध्ये प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर ती अनेक मालिका चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. गेल्या काही वर्षांपासून ती सूत्रसंचालिका म्हणूनही प्रेक्षकांसमोर आली. आज ती अभिनेत्री सोबतच एक निर्माती आणि व्यावसायिक सुद्धा आहे. फुलवंती हा प्राजक्ताची निर्मिती असणारा पहिला चित्रपट आहे.

फुलवंतीमध्ये आपल्याला प्राजक्ता माळी सोबत गश्मीर महाजनी मुख्य भूमिकेत दिसून आले. त्यांच्या शास्त्री बुवा या पात्राने सर्वांचीच मने जिंकली. त्याबरोबर इतरही कलाकार या सिनेमात पाहायला मिळाले. यातील आणखी एक महत्वपूर्ण भूमिका होती शास्त्री बुवांच्या बायकोची म्हणजेच ते पात्र साकारणारी स्नेहल तरडेची.

फुलवंती हा चित्रपट ११ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला. आणि आज या चित्रपटाला बरोबर एक वर्ष पूर्ण झाले. या निमित्त प्राजक्ता तिच्या सोशल मीडियावर व्यक्त झाली. त्यात ती लिहिते " यंदाचे जवळपास सगळेच पुरस्कार जीने जिंकून दिले त्या फुलवंतीला आज १ वर्ष पूर्ण झाले. देवाचे आभार की तू माझ्या आयुष्यात आलीस. ज्यांनी चित्रपट अजूनही पाहिलं नाही त्यांनी तो नक्की पहा. सौंदर्य आणि कलेची अनभिषिक्त सम्राज्ञी फुलवंती तर दुसरीकडे विद्याविभूषित प्रकांडपंडित शास्त्रीबुवा यांच्यामधील संघर्षाला आज एक वर्ष पूर्ण झाले."

प्राजक्ताने कॅप्शनमधून हा चित्रपट प्रेक्षक 'प्राइम व्हिडीओ' वर आणि 'झी ५' वर पाहू शकता, असे म्हटले आहे. फुलवंतीमधील गाणी, नृत्य, कथानक यामुळे प्रेक्षकांनी हा चित्रपट डोक्यावर उचलून धरला.

Comments
Add Comment