
मुंबई : मुंबईतील मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर विविध देखभाल, सिग्नलिंग आणि यार्ड रीमॉडेलिंगसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही स्थानकांदरम्यान लोकल सेवा रद्द करण्यात येणार असून, काही गाड्यांचे मार्ग बदलले जातील. प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
मध्य रेल्वेने कर्जत स्थानक व यार्डच्या पुनर्रचना कामासाठी कर्जत ते खोपोलीदरम्यान शनिवार, आज दुपारी १२:२० पासून ते रविवार, १२ ऑक्टोबर सायंकाळी ६:२० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घोषित केला आहे.
हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान रविवारी सकाळी ११:१० ते दुपारी ४:१० या वेळेत अप आणि डाउन मार्गावरील लोकल सेवा बंद राहणार आहे. या कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल दरम्यान विशेष लोकल गाड्या चालवण्यात येणार आहेत. प्रवाशांना दिलासा देण्यासाठी हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत ठाणे – वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेवर देखील रविवारी, १२ ऑक्टोबरला सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत बोरिवली-राम मंदिर आणि राम मंदिर-कांदिवली स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमध्ये ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीची कामे केली जातील. यामुळे अंधेरी ते बोरिवलीदरम्यान अप जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. काही गाड्या रद्द होतील तर काही हार्बर मार्गावर गोरेगावपर्यंत वळवण्यात येणार आहेत.
रेल्वेच्या या तात्पुरत्या बदलांमुळे प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाच्या वेळा आणि मार्ग तपासून नियोजन करणे आवश्यक आहे.