
मंत्री नितेश राणे यांनी दिली माहिती
मुंबई : पंतप्रधान धन धान्य कृषी योजना, राष्ट्रीय डाळी अभियान तसेच कृषी पायाभूत सुविधा निधी, पशुसंवर्धन, मत्स्यपालन आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील ११०० हून अधिक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय कृषी विज्ञान परिसर, नवी दिल्ली येथे करण्यात आले. यानिमित्ताने अंधेरी येथील आयसीएआर-सीआयएफइ कॅम्पस येथे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास केंद्रीय मत्स्यकी शिक्षण संस्थेचे सहसंचालक डॉ. नरोत्तम साहू, प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अर्पिता शर्मा, तसेच संस्थेचे इतर वरिष्ठ अधिकारी व विभागप्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, ‘पंतप्रधान धन धान्य कृषी योजना ही शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी आणि शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणारी एक महत्वाची योजना आहे. कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून वाटचाल करण्याचा प्रयत्न मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकार करत आहे. केंद्र-राज्य सरकारच्या समन्वयातून राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विशेष फायदा होईल. यामुळे शाश्वत शेतीला अधिक चालना मिळून उत्पादनही वाढेल. आपल्या राज्य सरकारने मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा दिला आहे. हीच योजना देशपातळीवर राबविण्यासाठी केंद्र सरकार विचार करत आहे. शेतकऱ्यांसाठी असलेल्या सर्व योजनांचा लाभ आता मच्छीमार बांधवांनाही मिळेल,’ असेही यावेळी मंत्री नितेश राणे म्हणाले.