Saturday, October 11, 2025

Fake Currency: अरे बापरे! पोलिसानेच काढला होता बनावट नोटांचा कारखाना; असा केला पर्दाफाश!

Fake Currency: अरे बापरे! पोलिसानेच काढला होता बनावट नोटांचा कारखाना; असा केला पर्दाफाश!

'सिद्धकला चहा'मधून १ कोटींच्या बनावट नोटा जप्त; पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केला मोठा खुलासा

मिरज (सांगली): मिरज शहरात पोलिसांनी बनावट चलन निर्मितीच्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश करत, तब्बल एक कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोल्हापूर पोलीस दलातील वाहनचालक हवालदार असल्याचे उघड झाल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार, या प्रकरणी हवालदार इब्रार आदम इनामदार (४४, रा. कसबा बावडा) याच्यासह एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

'चहाचे दुकान' गुन्हेगारीचे कनेक्शन

पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या बनावट नोटांची छपाई मुख्य आरोपी इनामदार याच्या कोल्हापूर, कसबा बावडा येथील 'सिद्धकला चहा' नावाच्या दुकानात कलर झेरॉक्स मशीन वापरून केली जात होती. हे दुकान बनावट नोटा तयार करण्याचे 'अड्डे' बनले होते.

कारवाई आणि जप्ती

मिरज-पंढरपूर रस्त्यावरील नीलजी बामणी पुलाखाली बनावट नोटांची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून सुप्रीत काडापा देसाई या आरोपीस ४२ हजार रुपयांच्या बनावट नोटांसह ताब्यात घेतले. त्यानंतर केलेल्या तपासात या साखळीचा उलगडा झाला.

पोलिसांनी आरोपींकडून ५०० आणि २०० रुपयांच्या बनावट नोटा, कलर झेरॉक्स मशीन, स्कॅनर-प्रिंटर आणि एक वाहन असा एकूण १ कोटी ११ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

टोळीची वितरण पद्धत

या टोळीने बाजारात नोटा कशा वितरित केल्या, याची माहिती देताना अधीक्षक घुगे म्हणाले की, आरोपी पाचशे रुपयांच्या खऱ्या नोटेच्या बदल्यात तीन बनावट नोटा देत असत.

या गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याबाबत घुगे यांनी सांगितले की, कारवाईचा अहवाल कोल्हापूर पोलिसांना पाठवण्यात आला आहे.

मुख्य सूत्रधार असलेले पोलीस हवालदार इब्रार आदम इनामदार (४४, रा. कसबा बावडा) याच्यासह सुप्रीत काडापा देसाई (रा. गडहिंग्लज), राहुल राजाराम जाधव (३३, कोरोची), नरेंद्र जगन्नाथ शिंदे (४०, टाकाळा), सिद्धेश जगदीश म्हात्रे (३८, रा. मालाड पूर्व, मुंबई) अशी याप्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने सर्वांना १३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

प्रामाणिक पोलिसांचे कौतुक

गुन्हेगारांना पकडणाऱ्या पोलिसांना योग्य पारितोषिक दिले जाईल, असे आश्वासनही पोलीस अधीक्षक घुगे यांनी यावेळी दिले. ही टोळी कोठे कोठे कार्यरत होती आणि नोटांचा किती मोठा साठा चलनात आणला गेला, याचा पुढील तपास गुन्हे शाखा करत आहे.

या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या सर्व आरोपींकडून चौकशी सुरू असून, या बनावट नोटा कोठे कोठे फिरवल्या गेल्या आणि या टोळीचा अजून कोणाशी संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे.

या कारवाईमुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पोलीस दलातीलच एका कर्मचाऱ्याचा यात सहभाग उघड झाल्याने या प्रकरणाची चर्चा होताना दिसत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >