मुंबई: "दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदा तोटा" या उक्तीप्रमाणे अवघ्या आठवड्याभरावर आलेल्या दिवाळीमुळे मुंबईतील घराघरात सध्या जय्यत तयारी सुरू आहे. साफसफाई, फराळ, आकर्षक कंदील आणि पणत्यांची खरेदीही सुरू झाली आहे. मात्र, दिवाळी म्हटलं की सर्वांना आठवणारे फटाके (Firecrackers) फोडण्यापूर्वी मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC) आता मुंबईच्या रस्त्यांवर फटाके विक्री करण्यावर बंदी (Ban on Firecracker Sale) घालण्याचा कडक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विनापरवाना होणाऱ्या फटाकेविक्रीवर पूर्णपणे 'बॅन' (Ban) लावण्यात आला आहे. मुंबई शहराची सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी महानगरपालिकेने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे, फुलबाजी, भुईचक्र, अनार किंवा बॉम्बची खरेदी आता अधिकृत ठिकाणीच करावी लागणार आहे.
दिवाळीपूर्वी BMC चा 'फटाके' वॉर!
दिवाळी तोंडावर असताना मुंबई महानगरपालिकेने शहरातील रस्त्यांवर आणि पदपथांवर होणाऱ्या अवैध फटाकेविक्रीविरोधात आता कठोर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. शहरातील सुरक्षा आणि नियमांचे पालन व्हावे, यासाठी पालिकेने मोठे पाऊल उचलले आहे. अवैध आणि धोकादायक विक्री थांबवण्यासाठी पालिकेने १५ ऑक्टोबरपासून ते दिवाळी संपेपर्यंत दररोज विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. रस्त्यांवर फटाके विकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, एवढेच नव्हे तर त्यांचा मालही जप्त केला जाईल. या मोहिमेत पालिकेकडून विशिष्ट ठिकाणी विशेष लक्ष दिले जाईल. भुयारी मार्गात आवाज आणि धूर करणाऱ्या फटाकेविक्रेत्यांवर पालिकेचे विशेष लक्ष असणार आहे. केवळ अवैध विक्रेत्यांवरच नव्हे, तर अधिकृत विक्रेत्यांनाही त्यांच्या परवान्यातील मर्यादेपेक्षा अतिरिक्त साठा ठेवल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या वर्षी या कारवाईत २५० किलो फटाके जप्त करण्यात आले होते. या वर्षी अंधेरी, दादर आणि कुर्ला यांसारख्या भागांमध्ये सर्वाधिक अनधिकृत विक्री सुरू असल्याचे दिसून आले आहे. या भागांना चाप लावण्यासाठी कठोर कारवाईचे संकेत पालिकेने दिले आहेत.
          कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षण संस्थांमधील खासगी वसतिगृहे (Hostel) आता विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या घटनांमुळे चर्चेत आली आहेत. ...
पुण्यात 'अॅटमबॉम्ब'वर बंदी, रात्री १० ते सकाळी ६ फटाके वाजवण्यास पूर्ण निर्बंध!
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात ध्वनी आणि वायू प्रदूषण टाळण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाने फटाके विक्री आणि फटाके वाजवण्यासंबंधी अत्यंत कठोर नियमावली जाहीर केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करत हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पुणे शहरात फटाके वाजवण्यासाठी आता वेळमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत फटाके वाजवण्यास पूर्णपणे निर्बंध घालण्यात आले आहेत. आवाज न करणारे, केवळ रंग निर्माण करणारे फटाके (उदा. फुलबाजी आणि अनार) हे फटाके मात्र या वेळमर्यादेनंतरही लावण्यास मुभा असेल. पोलिसांनी विशिष्ट प्रकारच्या फटाक्यांचे उत्पादन, विक्री आणि वापर यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. 'अॅटमबॉम्ब' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विशिष्ट स्फोटक फटाक्यांचे उत्पादन, विक्री आणि जवळ बाळगण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. १०० पेक्षा जास्त फटाके असलेल्या साखळी फटाक्यांचे उत्पादन, विक्री आणि वापरण्यास देखील पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. शांतता क्षेत्राचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालयांच्या परिसरापासून १०० मीटरच्या आत कोणत्याही प्रकारच्या फटाक्यांचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. या परिसरांना शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या कडक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे.

    




