
विशाखापट्टणम : टेक कंपनी गूगल भारताच्या डिजिटल क्षेत्रात आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक करणार आहे. कंपनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आशिया खंडातील सर्वात मोठे डेटा सेंटर क्लस्टर उभारणार आहे. या प्रकल्पात कंपनी सुमारे १० अब्ज डॉलर्स (सुमारे ८,७३० कोटी रुपये) गुंतवणार आहे. गूगल विशाखापट्टणममध्ये १ गिगावॉट (१ ॠथ) क्षमतेचा मेगा डेटा सेंटर क्लस्टर स्थापित करणार आहे. हा प्रकल्प केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण आशिया खंडातील सर्वात मोठा डेटा हब ठरणार आहे.
रिपोर्ट्सनुसार, हा क्लस्टर तीन वेगवेगळ्या कॅम्पसमध्ये विकसित केला जाईल. यामध्ये विशाखापट्टणम जिल्ह्यातील अदाविवरम आणि तरलुवाडा, तसेच अनकापल्ली जिल्ह्यातील रामबिल्ली यांचा समावेश असेल. गुगलचा हा महत्त्वाकांक्षी डेटा हब प्रकल्प जुलै २०२८ पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. गुगलची ही १० अब्ज डॉलर्सची मेगा गुंतवणूक केवळ डेटा सेंटरच्या उभारणीपुरती मर्यादित नाही. या प्रकल्पात तीन उच्च क्षमतेच्या सबमरीन केबल्स, केबल लँडिंग स्टेशन, मेट्रो फायबर नेटवर्क आणि अत्याधुनिक दूरसंचार पायाभूत सुविधांचे देखील बांधकाम केले जाईल. या प्रकल्पामुळे आंध्र प्रदेशला ‘डेटा इन्फ्रास्ट्रक्चर हब’ बनवण्याच्या दिशेने मोठे पाऊल पडणार आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि गूगल यांच्यात डिसेंबर२०२४ मध्ये सामंजस्य करार झाला होता. त्यानंतर राज्य सरकारने ‘डेटा सिटी’ विकासाला गती देण्यासाठी आयटी आणि कॉपीराईट कायद्यांमध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मुख्यमंत्री नायडू यांच्या नेतृत्वाखालील राज्याच्या गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाकडून या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे