Saturday, October 11, 2025

माजी विद्यार्थ्यांना आपल्या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आरोग्याची काळजी; राबवली अशी मोहीम

माजी विद्यार्थ्यांना आपल्या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आरोग्याची काळजी; राबवली अशी मोहीम

मुंबई (खास प्रतिनिधी) : आपण ज्या शाळेत शिकून मोठे झालो आहोत आणि मोठ्या हुद्यावर पोहोचल्यानंतर आपल्या शाळेबाबत काहीतरी करावे असे प्रत्येक माजी विद्यार्थ्यांना वाटत असते. शाळेतील आठवणी जागत अनेक माजी विद्यार्थी हे एकत्र येत स्नेहसंमेलन करताना आपण वाचले आहे, परंतु आपण ज्या शाळेत शिकलो त्याच शाळांमध्ये सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी पुढाकार घेतानाही माजी विद्यार्थी दिसत आहे.

शीव येथे शीव शिक्षण संस्था संचालित साधना विद्यालयाच्यावतीने या विद्यालयातील शैक्षणिक वर्ष १९७४-७५ या दहावी बॅचचे माजी विद्यार्थी डॉ अनिलकुमार भोसले, डॉ अर्चना अनिलकुमार भोसले, डॉ किसन जेधे व महापालिकेचे निवृत्त प्रमुख लेखापाल (वित्त) हरीभाऊ निकम यांच्यासह जगदीश भावसार, महादेव पिचके, विष्णू डोईफोडे, मंगला निकम डोईफोडे, शोभा लांजे पाटील, अनामिका चव्हाण सावंत, नुतन बोरकर वेलणकर व इतर माजी विद्यार्थी या सर्वांनी मिळून शाळेविषयी ऋण व्यक्त करत साधना विद्यालयातील विद्यार्थ्यांचे‌ आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते.

या शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शाळेतील जवळपास १५०० विद्यार्थ्यांची तसेच शिक्षकांची व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचीही आरोग्य तपासणी केली. या शिबिरास शिक्षण साधना मंडळाचे सचिव चंद्रकांत खोपडे व मुख्याध्यापक विजय गायकवाड व त्यांचे सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. तसेच या माजी विद्यार्थ्यांचे शिक्षक व शिक्षिका यांनी या माजी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

Comments
Add Comment