नाशिक : पुढील काही महिन्यांत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (नगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिका) निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील सगळ्या पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आज नाशिकमध्ये भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीबाबत एक मोठं वक्तव्य केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, "जिथे शक्य असेल, तिथे महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवणार आहोत."
फडणवीस म्हणाले, "आम्ही संघटनात्मक परिस्थितीचा आणि युती कुठे होऊ शकते याचा आढावा घेत आहोत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी विभागांच्या बैठका घेतल्या आहेत. आम्ही त्या विभागांमधील नगरपालिकाdeve, जिल्हा परिषदा आणि महापालिका यांचा आढावा घेत आहोत. तेथील पक्षाची ताकद, बूथची रचना, मागच्या निवडणुकीत काय परिस्थिती होती आणि आता काय आहे, युती कशी करायची आणि कुठे-कुठे करायची, या सगळ्या गोष्टींचा आढावा आम्ही या बैठकांमधून घेत आहोत."
नाशिकमध्ये आम्ही उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेतला आहे. या बैठकीत आम्ही कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यांना पुढील मार्गदर्शन केले आहे. "मागच्या निवडणुकीत आम्हाला तिथे चांगले यश मिळाले होते, याही वेळी चांगले यश मिळेल अशी मला अपेक्षा आहे," असे फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल बोलताना फडणवीस यांनी आधीचे एक वक्तव्य आठवण करून दिले. ते म्हणाले की, "जिथे शक्य असेल तिथे महायुती करू," असेच विधान मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही केले होते. पाटील यांनी हे देखील स्पष्ट केले होते की, कोणत्याही परिस्थितीत कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही. तिथे आपला चांगला कार्यकर्ता असेल, तर 'मैत्रीपूर्ण लढत' होईल.
तर दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपवर आरोप केला होता की, "भाजप एकीकडे युतीबद्दल बोलते, तर दुसरीकडे एकांतात स्वबळावर निवडणुका लढवण्याची भाषा करते." त्यामुळे आता महायुतीमध्ये नेमके काय सुरू आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी युती होणार की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






