Friday, November 7, 2025

‘श्री गणेश गौरव पुरस्कार स्पर्धा - २०२५’ : परिमंडळनिहाय सर्वोत्तम कोणती ठरली नैसर्गिक, कृत्रिम गणेशमूर्ती विसर्जन स्थळे

‘श्री गणेश गौरव पुरस्कार स्पर्धा - २०२५’ : परिमंडळनिहाय सर्वोत्तम कोणती ठरली नैसर्गिक, कृत्रिम गणेशमूर्ती विसर्जन स्थळे

मुंबई (खास प्रतिनिधी) : यंदाचा श्रीगणेशोत्सव गणेशभक्तांसोबतच प्रशासनासाठी देखील वेगळा होता. पर्यावरणपूरक पद्धतीने श्रीगणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने नागरिकांनी श्रीगणेश मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यास प्राधान्य दिले. मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे उत्तम नियोजन तसेच श्रीगणेश मंडळ आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे यंदाचा श्रीगणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडला, असे गौरवोद्गार अतिरिक्त मआयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी काढले.

मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाच्या वतीने आयोजित ‘श्री गणेश गौरव पुरस्कार स्पर्धा- २०२५’चा पुरस्कार वितरण सोहळा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऐतिहासिक सभागृहात शुक्रवारी १० ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडला. त्यावेळी सैनी बोलत होते. तसेच, परिमंडळनिहाय सर्वोत्तम नैसर्गिक गणेशमूर्ती विसर्जन स्थळ व कृत्रिम गणेशमूर्ती विसर्जन स्थळ स्पर्धा -२०२५ अंतर्गत प्रशासकीय विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. उप आयुक्त (विशेष तथा परिमंडळ-१) चंदा जाधव, उप आयुक्त (परिमंडळ-२) तथा गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनात तसेच उप आयुक्त (परिमंडळ-२) तथा गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांच्या देखरेखीत मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाच्या वतीने दरवर्षी मुंबई महानगरातील सार्वजनिक मंडळांसाठी श्री गणेश गौरव पुरस्कार स्पर्धेचे आयोजन केले जाते. यामध्ये पर्यावरण, रस्ते अपघात, मराठी भाषा, मतदान, आरोग्य, अवयवदान आदी विषयांवर अभिनव पद्धतीने जनजागृती करणारे सर्वोत्कृष्ट मंडळ, विविध सामाजिक उपक्रमांचे अभिनव पद्धतीने आयोजन करणाऱ्या मंडळांना पुरस्कार दिला जातो. शाडू मातीची सर्वोत्कृष्ट मूर्ती, सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार, सर्वोत्कृष्ट मूर्तीकारांना गौरविले जाते. सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. यंदा या स्पर्धेचे ३६वे वर्ष असून या स्पर्धेत ६४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी भाग घेतला होता.

पुरस्कार सोहळ्यातील उपस्थितांना संबोधित करताना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी म्हणाले की, यंदाच्या श्रीगणेशोत्सवात पर्यावरपुरकतेला प्राधान्य देत यंदा शाडूच्या मातीसोबत पर्यावरणपूरक रंगसुद्धा मूर्तीकारांना निःशुल्क वितरित करण्यात आले. अत्यंत कमी वेळात उत्तम नियोजन करत सर्व श्रीगणेश मंडळांच्या सहकार्याने निर्विघ्नपणे आणि अत्यंत उत्साहात गणेशोत्सव पार पडला. सैनी यांनी यावेळी दिली.

अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे प्रमुख कार्यवाह सुरेश सरनोबत यांनी महाराष्ट्रात पडलेल्या ओल्या दुष्काळातील पीडितांना श्रीगणेशोत्सव मंडळांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. दरम्यान, धारावी येथील हनुमान सेवा मंडळाने पुरस्काराची रक्कम दुष्काळाग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याची घोषणा केली.

परिमंडळनिहाय सर्वोत्तम नैसर्गिक गणेशमूर्ती विसर्जन स्थळ व कृत्रिम गणेशमूर्ती विसर्जन स्थळ स्पर्धा-२०२५

सर्वोत्तम नैसर्गिक विसर्जन स्थळ

*उप आयुक्त (परिमंडळ - १) - डी विभाग - स्थळ : स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी)

उप आयुक्त (परिमंडळ - २) - जी उत्तर विभाग - स्थळ : केळूसकर मार्ग (उत्तर), दादर

उप आयुक्त (परिमंडळ - ३) - एच पश्चिम विभाग - स्थळ : बँडस्टँड, बी. जे. रोड, वांद्रे (पश्चिम)

उप आयुक्त (परिमंडळ - ४) - के पश्चिम विभाग - स्थळ : जुहू समुद्रकिनारा

उप आयुक्त (परिमंडळ -५ ) - एम पश्चिम विभाग - स्थळ : चरई तलाव, हेमू कलानी मार्ग, चेंबूर

उप आयुक्त (परिमंडळ - ६) - एस विभाग - स्थळ : गणेश घाट, पवई तलाव, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड, पवई

उप आयुक्त (परिमंडळ - ७) - आर मध्य विभाग - स्थळ : गोराई जेट्टी, बोरिवली (पश्चिम)

सर्वोत्तम कृत्रिम विसर्जन स्थळ

उप आयुक्त (परिमंडळ - १) - डी विभाग - स्थळ : स्वराज्यभूमी (गिरगांव चौपाटी)

उप आयुक्त (परिमंडळ - २) - जी दक्षिण विभाग - स्थळ : जांभोरी मैदान, वरळी

उप आयुक्त (परिमंडळ - ३) - के पूर्व विभाग - स्थळ : हेडगेवार मैदान, हनुमान रोड, विलेपार्ले (पू),

उप आयुक्त (परिमंडळ - ४) - पी उत्तर विभाग - स्थळ: शांताराम तलाव

उप आयुक्त (परिमंडळ - ४) - पी दक्षिण विभाग - स्थळ: बांगूर नगर तलाव

उप आयुक्त (परिमंडळ - ५) - एल विभाग - स्थळ : वस्ताद लहुजी साळवे मैदान, विजय फायर मार्ग, चांदिवली

उप आयुक्त (परिमंडळ - ५) - एम पूर्व विभाग - बाळासाहेब ठाकरे उद्यान, प्रभाग क्रमांक १४१

उप आयुक्त (परिमंडळ - ६) - एस विभाग - स्थळ : महानगरपालिका भूखंड न ७/४. क्र. भु. कोपरी, पवई

उप आयुक्त (परिमंडळ - ७) - आर दक्षिण विभाग – स्थळ : लालमाती मैदान, अशोक नगर, कांदिवली (पश्चिम)

Comments
Add Comment