
मुंबई: भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर याची आगामी रणजी करंडक (Ranji Trophy) हंगामासाठी मुंबई क्रिकेट संघाने कर्णधारपदी निवड केली आहे. मागील हंगामात संघाचे यशस्वी नेतृत्व करणारा अजिंक्य रहाणे यांनी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) ही महत्त्वपूर्ण जबाबदारी शार्दुल ठाकूर याच्याकडे सोपवली आहे.
अजिंक्य रहाणे याने संघाच्या भवितव्यासाठी नवीन नेतृत्वाला संधी देण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर शार्दुल ठाकूरची निवड एकमताने करण्यात आली. मुंबई रणजी करंडक २०२५-२६ हंगामाची सुरुवात १५ ऑक्टोबरपासून जम्मू आणि काश्मीरविरुद्ध (Jammu & Kashmir) श्रीनगर येथे होणार आहे.
एमसीएने पहिल्या सामन्यासाठी १६ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या संघात शार्दुल ठाकूर (कर्णधार) सोबतच अजिंक्य रहाणे आणि स्टार फलंदाज सरफराज खान यांचा समावेश आहे. भारतीय संघातील व्यस्ततेमुळे किंवा विश्रांतीमुळे श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांना पहिल्या सामन्याच्या संघात स्थान मिळालेले नाही.
३३ वर्षीय शार्दुल ठाकूरकडे प्रथम श्रेणी क्रिकेटचा मोठा अनुभव आहे. त्याने ९७ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ३०० हून अधिक बळी घेतले आहेत, तसेच उपयुक्त फलंदाजी करत २,६०० हून अधिक धावा देखील केल्या आहेत. गोलंदाजी आणि फलंदाजीतील त्याच्या अष्टपैलू योगदानामुळे त्याला 'रणजी किंग' मुंबईचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.
पहिल्या सामन्यासाठी मुंबईचा संघ
शार्दुल ठाकूर (कर्णधार), आयुष म्हात्रे, आकाश आनंद (यष्टीरक्षक), हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), सिद्धेश लाड, अजिंक्य रहाणे, सरफराज खान, शिवम दुबे, शम्स मुलानी, तनुष कोटियन, तुषार देशपांडे, सिल्वेस्टर डिसोझा, इरफान उमैर, मुशीर खान, अखिल हेरवाडकर, रॉयस्टन डायस.