मुंबई : बॉलिवूडची आघाडीची नायिका दीपिका पादुकोण मागील अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरली आहे. दीपिका आई झाल्यापासून तिने सिनेसृष्टीत केवळ आठ तास काम करणे ठरवले आहे. तिच्या या निर्णयामुळे तिने संदिप रेड्डी वांगा यांचा स्पिरिट आणि अभिताभ बच्चन सहकलाकार असलेला कल्की या चित्रपटाचा सिक्वेल असलेला चित्रपट गमवल्याची चर्चा सुरु आहे. अखेर या गोष्टीवर दीपिकाने एका कार्यक्रमादरम्यान मौन सोडले आहे.
दीपिकाच्या 'लिव्ह लव्ह लाफ' या मानसिक संतुलनाशी निगडीत फाऊंडेशनला दहा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात दीपिकाला माध्यमांद्वारे अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यापैकी, जे तुला योग्य वाटतं, त्या गोष्टींची मागणी करण्यासाठी तुला किंमत चुकवावी लागते, असं तुला कधी वाटलं का? या प्रश्नावर दीपिकाने काम करण्याच्या आठ तासांच्या मागणीवर भाष्य केले.
यावेळी दीपिका म्हणाली, "जर एक महिला असल्यामुळे ही गोष्ट दबाव टाकल्यासारखी वाटत असेल, तर असेच आहे. परंतु ही गोष्ट लपलेली नाही की भारतीय सिनेसृष्टीमध्ये अनेक सुपरस्टार वर्षानुवर्षे आठ तासांचे काम करत आहेत. मात्र ही गोष्ट कधीच चर्चेत आली नाही. मी आता नाव घेऊ इच्छित नाही आणि त्या गोष्टीला महत्त्वही देऊ इच्छित नाही, परंतु ही सर्वसामान्य बाब आहे. सार्वजनिकरित्या अनेक अभिनेत्यांबद्दल लोकांना माहीत आहे की ते फक्त आठ तासच काम करतात. काही जण फक्त सोमवार ते शुक्रवार काम करतात आणि वीकेंडला काम करत नाहीत."
तसेच '"मी नेहमीच माझी लढाई शांतपणे आणि गुपचूप लढली आहे. कधी कधी या गोष्टी सार्वजनिक होतात, पण ही माझी पद्धत नाही. माझे संगोपन अशा पद्धतीने झाले नाही. माझ्यासाठी काही गोष्टींची लढाई लढणे आणि त्याबद्दल आदरपूर्वक राहणे ही पद्धत आहे." असे उत्तर दीपिकाने दिले.






