विरार (प्रतिनिधी) : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त मिठाई तयार करणाऱ्या व्यावसायिकांवर नजर ठेवण्यासाठी वसई - विरारमधील अन्न आणि औषध प्रशासन सज्ज झाले आहे. नालासोपारा परिसरात गुरुवारी धाडसत्र राबवित कारवाई करण्यात आली आहे.
दिवाळी या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर मिठाईची खरेदी करण्यात येते. याच धर्तीवर मिठाईमध्ये भेसळ करणारे दरवर्षी मिठाई मध्ये भेसळ करण्यासाठी सक्रिय होतात. यासाठी दरवर्षी अन्न व औषध प्रशासन भेसळयुक्त मावा, भेसळयुक्त दुधावर, मिठाईवर कारवाई करत असते. मागील वर्षी देखील ही मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आली होती. यंदाही या कारवाईस पालघर जिल्ह्यातील अन्न व औषध विभाग सज्ज झाले आहे. यासाठी विशेष मोहीम हाती घेत खवा, मावा विक्रेते आणि पुरवठा करणाऱ्या ठिकाणी तसेच मिठाई च्या दुकानात, मावा तयार करण्याच्या ठिकणी छापे टाकत तपासणी हाती घेण्यात आली आहे. यामध्ये भेसळयुक्त काही पदार्थ आहेत कि नाही हे तपासण्यासाठी खाद्यतेल, बेसन, खवा, मावा, मिठाई, बर्फी, फरसाण या खाद्यपदार्थांचे नमुने घेत ते तपासणी साठी देण्यात येत आहेत.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आम्ही भेसळयुक्त पदार्थ रोखण्यासाठी तपासणी करत आहोत असे अन्न सुरक्षा अधिकारी गोपाळ महावरे यांनी सांगितले. ग्राहकांनी नामांकित दुकानातूनच मिठाई खऱेदी करावी असेही आवाहन त्यांनी केले आहे.दरम्यान, नालासोपारा पश्चिमेकडील यशवंत गौरव येथील एका मॉलमध्ये स्मार्ट सहकारी भांडार नावाचे दुकान आहे. एका ग्राहकाने या भांडारातून विकत घेतेलल्या चॉकलेटला बुरशी लागल्याचे आढळले होते. याबाबत त्याने अन्न् व औषध प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यानुसार बुधवारी या मॉल मधील स्मार्ट सहकारी भांडारात छापा टाकला. या कारवाईत बुरशीयुक्त चॉकलेट, ज्युस आणि अन्य पदार्थ जप्त कऱण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासनाने परिसरातील अन्य दुकानातही छापे टाकून नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत.






