जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षेच्या परिस्थितीचा उच्चस्तरीय आढावा घेण्यासाठी घेण्यात आलेल्या या बैठकीत अमित शहा यांनी, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रशासित प्रदेश प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांनी उचललेल्या तातडीच्या पावलांचं कौतुक केलं. या उपाययोजनांमुळे जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा स्थिती अधिक बळकट झाली आहे.यावेळी गृह मंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरमधून दहशतवाद संपवण्याच्या मोदी सरकारच्या कटिबद्धतेची पुनरावृत्ती केली. त्यांनी सांगितलं की, सुरक्षा यंत्रणांच्या ठोस प्रयत्नांमुळे, देशविघातक शक्तींनी पोसलेल्या दहशतवादी यंत्रणांचा जवळपास अंत झाला आहे. त्यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितलं की, “शांतता आणि सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या कोणत्याही हालचालींना हाणून पाडण्याचे सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक देण्यात आली आहे.”
पुढे गृह मंत्र्यांनी स्पष्ट केलं की, “दहशतवाद संपवण्यासाठी सर्व सुरक्षा यंत्रणांनी सतर्क राहून समन्वयाने काम करणं अत्यंत गरजेचं आहे.” ते पुढे म्हणाले, “हिवाळा जवळ येत आहे. बर्फवृष्टीचा फायदा घेऊन दहशतवादी घुसखोरी करू पाहू शकतात, त्यामुळे आपले सुरक्षा दल पूर्णपणे सज्ज असावेत.”या बैठकीस जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय गृह सचिव, गुप्तचर विभागाचे संचालक, थलसेनाध्यक्ष, जम्मू आणि काश्मीरचे मुख्य सचिव व पोलीस महासंचालक, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांचे महासंचालक, भारत सरकार, लष्कर आणि जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.