
मुंबई: मुंबईत बुधवारी रात्रीच्या सुमारास कारचा गंभीर अपघात घडला. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वेगाने जाणारी पोर्शे कार डिव्हायडरला जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की पोर्शे कारचा चेंदामेंदा झाला.
वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास बीएमडब्लू आणि पोर्शे कार यांच्यात शर्यत लागली होती. यावेळी पोर्शे कारच्या ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ही कार डिव्हायडरला जाऊन जोरात आदळली. यावेळी कार तीन ते चार वेळा पलटीही झाली. यात पोर्शे कारच्या ड्रायव्हरला गंभीर जखम झाली आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातात कार चालक गंभीररित्या जखमी झाला आहे. दरम्यान, बीएमडब्लू कारसोबत या पोर्शे कारची रेसिंग सुरू होती. याचवेळेस हा अपघात घडला.
मुंबईच्या मुख्य रस्त्यांवर, विशेषतः वेस्टर्न एक्सप्रेस हायवेसारख्या वर्दळीच्या मार्गांवर तरुणाईकडून होणारे अतिवेगाचे आणि बेजबाबदार ड्रायव्हिंगचे प्रकार पुन्हा एकदा समोर आले आहेत. अशा धोकादायक कृत्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.