
मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेचे कामकाज संगणक प्रणालीद्वारेच केले जात असल्याने या अद्ययावत तंत्रज्ञान आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे प्रशासनाला आता सायबर हल्ल्याची भीती वाटू लागली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आता माहिती तंत्रज्ञान सुरक्षेच्यादृष्टीकोनातून धोरणात्मक निर्णय घेत कार्यालयीन नेटवर्क वरील संगणकांमध्ये इंटरनेट सेवा न घेण्याचे निर्देश दिले आहे. या संगणकांवर कार्यालयीन नेटवर्क नाही अशाच संगणंकांमध्ये इंटरनेट सेवा घेण्याचे स्पष्ट निर्देशच माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने परिपत्रकाद्वारे दिले आहे.
मुंबई महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये इंटरनेटच्या वापरामुळे माहिती तंत्रज्ञान यंत्रणंवर सायबर सुरक्षेचे धोके निर्माण होत असतात. त्यामुळे कार्यालयीन नेटवर्कवरील संगणकांमध्ये महापालिकेची व इतर शासकीय तसेच अत्यावश्यक वेबसाईट्स वगळता इंटरनेट सुविधा मर्यादित करण्यात आली आहे. तसेच इंटरनेटवरील इतर आवश्यक वेबसाईट्स करता काही संगणकांना कार्यालयीन नेटवर्क अर्थात लॅन वेगळे करून स्वतंत्र इंटरनेट वापराला परवानगी दिलेली आहे. मात्र, काही विभाग तथा कार्यालयांनी या सुविधेचा गैरवापर करून बहुसंख्य संगणक कार्यालयीन नेटवर्कपासून वेगळे करून इंटरनेट वापरासाठी जोडले आहेत.
नेटवर्क सुरक्षा, क्लाऊड सुरक्षा, मोबाईल सुरक्षा, अॅप्लिकेशन सुरक्षा सेवांचा वापर माहिती तंत्रज्ञान विभागांतर्गत येत असून महापालिकेत अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या विविध सुरक्षा साधनांची अंमलबजावणी करणे शक्य होत नाही, अशा संगणकांची माहिती अर्थात हार्डवेअर तथा सॉफ्टवेरअ संबंधी प्रणालीमध्ये गोळा होवू शकत नाही, परिणामी असे संगणक सायबर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून धोकादायक ठरू शकतात असे माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. माहिती तंत्रज्ञान विभागाने याबाबतचे धोरणात्मक निर्णयाचे परिपत्रकच जारी केले असून त्यामध्ये त्यांनी महापालिका तथा इतर शासकीय तसेच आवश्यक संकेतस्थळ व्यतिरिक्त इंटरनेट वापरणे गरजेचे असल्यास अशा कार्यालय तथा विभागांनी योग्य ती कारणे संंबंधित अधिकाऱ्यांना देणे आणि त्याची मंजुरी घेणे आवश्यक असल्याचे नमुद केलेे आहे
तसेच जर कोणत्याही विभाग तथा कार्यालयांमध्ये दोन पेक्षा जास्त संगणक कार्यालयीन नेटवर्क पासून वेगळे ठेवलेले अथवा डोमेनवर नसतील तर संबंधित विभाग प्रमुख तथा कार्यालयपमुख यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही या धोरणात स्पष्ट केले आहे. इंटरनेट वापरासाठी स्वतंत्र असलेल्या संगणकांची माहिती व तंत्रज्ञान विभागाला याची माहिती देण्यात यावी.शिवाय इंटरनेट सुविधा असलेला संगणक महापालिकेच्या कार्यालयीन नेटवर्कवर अथवा कार्यालयीन नेटवर्कवरील संगणक सोबत जोडण्यात यावे असेही स्पष्ट निर्देश परिपत्रकाद्वारे माहिती व तंत्रज्ञान विभागाने दिले आहे. सध्या विविध कामांमध्ये नवीन व अद्ययावत तंत्रज्ञान व इंटरनेट यांचा वापर वाढत आहे.या वाढत्या तंत्रज्ञानाबरोबरच सायबर हल्ले अधिक सामान्य व अत्याधुनिक होत आहेत. सायबर जोखीम कमी करण्यासाठी विविध माहिती तंत्रज्ञान सुरक्षा उपायांची आवश्यकता असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.