ठाणे - मुंबई आणि उपनगरांमध्ये माणसांप्रमाणेच वाहनांमध्येही वाढ होत आहे. तसेच शहरांमध्ये सुरू असलेल्या इन्फ्रास्ट्र्क्चरच्या कामांमुळे दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या तीव्र होत आहे. या समस्यांवर अनेकदा समाज माध्यमांवर नागरिक रोष व्यक्त करत असतात. अशीच एक पोस्ट मराठी अभिनेता श्रेयस राजने इंस्टाग्रामवर केली आहे. ही पोस्ट ठाणे घोडबंदर येथील वाहतूक कोंडीबद्दल मिश्कीलपणे भाष्य करताना दिसते.
या पोस्टमध्ये अभिनेता श्रेयस राजने लिहले आहे की, “ठाण्यातून बोरिवली किंवा तिकडच्या इतर भागात जायला घोडबंदर रोडचा वापर करू नका. खूप वाहतूक कोंडी आहे. एवढ्या वेळात तुम्ही विमानाने दुबईला पोहोचाल.” यासह श्रेयसने ट्रॅफिक, घोडबंदर रोड आणि ठाणे असे हॅशटॅगही लिहिले आहेत.
ठाणे घोडबंदर हा रोड नेहमीच वाहतुकीमुळे गजबजलेला असतो. पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून या रोडची ओळख आहे. त्यामुळे मुंबई किंवा उपनगरातून ठाण्याच्या बाजूचा प्रवास कमी वेळात करता येतो. मात्र या मार्गावर दिवसाचे २४ तास वाहतूक कोंडी असल्यामुळे प्रवासाला फार वेळ लागतो. त्यामुळे यापूर्वीसुद्धा रोडवरील खड्ड्यांबाबत आणि वाहतूक कोंडीबद्दल अनेक अभिनेता/अभिनेत्रींनी तसेच सामान्य नागरिकांनीही खोचक प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या.