Thursday, October 9, 2025

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, भिडे पुलाबाबत झाला महत्त्वाचा निर्णय

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, भिडे पुलाबाबत झाला महत्त्वाचा निर्णय

पुणे : मेट्रोच्या कामांमुळे बंद ठेवलेला भिडे पूल आता वाहतुकीकरिता सुरू करण्यात आला आहे. शनिवार ११ ऑक्टोबरपासून भिडे पूल वाहतुकीकरिता खुला केला जाईल. दररोज सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत भिडे पुलावरुन वाहतूक सुरू राहणार आहे. उर्वरित वेळेसाठी भिडे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवला जाईल. या निर्णयामुळे डेक्कन आणि नारायण पेठ परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

भिडे पूल बंद असताना नारायण पेठेकडून डेक्कन जिमखान्याकडे जाणाऱ्या तसंच नदीपात्रातील रस्त्याने दोन्ही दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना वळसा घालून जावं लागत होतं. या बंदमुळे दैनंदिन प्रवास वेळखाऊ आणि त्रासदायक ठरत होता. यामुळेच नागरिक संघटना आणि स्थानिक व्यावसायिक वारंवार भिडे पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी करत होते. अखेर ही मागणी मंजूर झाली आहे. वाहतूक विभागाने दिवाळीच्या गर्दीचा विचार करुन मर्यादीत काळासाठी भिडे पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला आहे.

दिवाळीच्या गर्दीचा विचार करुन भिडे पूल शनिवार ११ ऑक्टोबरपासून दररोज सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत वाहतुकीसाठी खुला असेल. उर्वरित वेळेसाठी भिडे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवला जाईल. पूल बंद असतानाच्या काळात मेट्रोचे प्रशासन त्यांचे नियोजीत काम करेल, असे पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने सांगितले. भिडे पूल वाहतुकीसाठी उपलब्ध होणार असल्यामुळे डेक्कन, नारायण पेठ, शनिवारवाडा परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होईल, असेही पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने सांगितले. आवश्यकतेनुसार नियोजनात बदल केला जाईल, असे संकेत पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने दिले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >