
सोलापूर : बार्शी तालुक्यातील शेतकरी उत्तम दत्तात्रय जाधव यांच्या ४ लाख रुपयांच्या चेकचोरी प्रकरणात अखेर बँक ऑफ महाराष्ट्रच्या सोलापूर नवी पेठ शाखेकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोयाबीन विकून कंपनीकडून मिळालेला चेक त्यांनी बँकेच्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकला होता. मात्र, तो चेक एका व्यक्तीने फसवणूक करत चोरून त्याच्या खात्यावर पैसे वळते केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
या प्रकरणात अमर तेपेदार या व्यक्तीने बँकेच्या कर्मचाऱ्यांना फसवून ड्रॉप बॉक्स उघडायला लावल्याचा आरोप आहे. त्याने "स्लिपवर खाते क्रमांक चुकीचा टाकला आहे" असे सांगून बँक कर्मचाऱ्यांची नजर चुकवून चेक चोरल्याची तक्रार बँकेने पोलिसांकडे दिली आहे. हा चेक नंतर दुसऱ्याच खात्यात जमा झाला आणि शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा न झाल्याने हा प्रकार उघडकीस आला.
शेतकरी उत्तम जाधव गेल्या आठवड्यापासून बँकेत फेऱ्या मारत होते, मात्र बँक त्यांच्या तक्रारीची कोणतीही दखल घेत नव्हती. त्यांना सतत दुर्लक्षित केले जात होते. अखेर प्रसारमाध्यमांमध्ये बातमी झळकल्यानंतर बँकेला जाग आली आणि त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली.
या प्रकारामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला असून, बँकेच्या निष्काळजीपणामुळे सामान्य ग्राहकांची सुरक्षितता धोक्यात येत असल्याचे चित्र समोर आले आहे. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.