Thursday, October 9, 2025

खामला निबंधक कार्यालयात भ्रष्टाचाराचा पर्दाफाश, महसूलमंत्र्यांच्या धाडीनंतर अधिकारी निलंबित

खामला निबंधक कार्यालयात भ्रष्टाचाराचा पर्दाफाश, महसूलमंत्र्यांच्या धाडीनंतर अधिकारी निलंबित

नागपूर : राज्यातील नोंदणी कार्यालयांमधील भ्रष्टाचाराच्या तक्रारी अनेक वेळा समोर आल्या आहेत. नागपूरच्या खामला परिसरातील दुय्यम निबंधक कार्यालयातही अशाच प्रकारच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः अचानक या कार्यालयावर धाड टाकत कार्यप्रणालीची पाहणी केली. या धाडीत, एका अधिकाऱ्याच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये पाच हजार रुपयांची रोकड सापडली. विशेष म्हणजे, ही कारवाई पत्रकार आणि कॅमेऱ्यांच्या उपस्थितीत झाली, त्यामुळे संपूर्ण प्रकार जनतेसमोर उघड झाला. ही कारवाई महसूल विभागातील पारदर्शकता राखण्यासाठी आणि भ्रष्टाचाराविरोधात कठोर पावले उचलण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली आहे.

नागरिकांकडून या कार्यालयाबाबत भ्रष्टाचाराच्या तक्रारी वारंवार येत होत्या. या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष भेट देण्याचा निर्णय घेतला, असे महसूलमंत्र्यांच्यावतीने सांगण्यात आले. धाडीनंतर त्वरित पोलिस चौकशीचे आदेश देण्यात आले आणि दोषींवर कारवाईचा इशारा दिला.

या प्रकरणात आता सह दुय्यम निबंधक अ. तु. कपाले यांना निलंबित करण्यात आले आहे. सरकारने भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. कोणीही लाच मागितल्यास, त्याची भीती न बाळगता तक्रार करावी. पारदर्शक आणि जनहितकारी प्रशासन हेच आमचे उद्दिष्ट आहे. राज्यातील महसूल विभाग अधिक उत्तरदायी आणि नागरिकांसाठी अधिक सोयीस्कर व्हावा यासाठी, आगामी काही दिवसांत सर्व उपनिबंधक कार्यालयांमध्ये विशेष तपास मोहीम राबविण्यात येणार असल्याचे संकेत बावनकुळे यांनी दिले आहेत.

Comments
Add Comment