
देवरुख (प्रतिनिधी) : देवरुख शहराला हादरवून सोडणाऱ्या सोने व्यापारी धनंजय केतकर अपहरण व लूट प्रकरणात एकूण १२ आरोपींचा सहभाग असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा तपास करताना देवरुख पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना गजाआड करण्यात यश मिळवले आहे; मात्र, या गुन्ह्यातील पाच आरोपी अजूनही मोकाट असल्याने त्यांना पकडणे पोलीस यंत्रणेसाठी मोठे आव्हान ठरले आहे.
धनंजय केतकर हे साखरप्याहून देवरुखच्या दिशेने येत असताना वांझोळे येथे त्यांचे अपहरण करण्यात आले होते. अपहरणकर्त्यांनी त्यांच्याकडील दागिने आणि रोख रक्कम लुटून त्यांना काही अंतरावर असलेल्या वाटूळ येथे सोडून दिले होते. या घटनेनंतर केतकर यांनी देवरुख पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात फिर्याद दाखल केली. देवरुख पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत काही दिवसांतच या गुन्ह्याचा मोठा पर्दाफाश केला. आतापर्यंत पोलिसांनी सात आरोपींना अटक करून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. या गुन्ह्याच्या मुळाशी जाताना एक महत्त्वाची बाब उघड झाली.
संगमेश्वर तालुक्यातील भडकंबा येथील दोन स्थानिक तरुणांनी मुंबईजवळील बदलापूर येथील तरुणांना हाताशी धरून व्यापारी केतकर यांचे अपहरण केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. तपासाच्या अंतिम टप्प्यात, या अपहरणाच्या कटात सामील असलेल्या आरोपींची एकूण संख्या १२ असल्याचे निश्चित झाले आहे. यातील ५ आरोपी अजूनही फरार असल्याने देवरुख पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन तपासणी केली; परंतु आरोपी तिथे मिळून आले नाहीत. पोलिसांच्या दप्तरी या सर्व आरोपींची नावे नोंद आहेत. हे उर्वरित ५ फरारी आरोपी जेरबंद करणे, हे सध्या देवरुख पोलीस आणि संपूर्ण तपास यंत्रणेसमोर मोठे आव्हान बनले आहे. पोलिसांचे पथक तपास करत आहे.