
नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी प्लॅटफॉर्मला राम राम ठोकत, पूर्णपणे भारतीय असलेल्या 'झोहो मेल' (Zoho Mail) या स्वदेशी ई-मेल सेवेचा स्वीकार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारत' आणि 'स्वदेशी'च्या आवाहनाला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
अमित शहा यांचा हा निर्णय देशांतर्गत (स्वदेशी) तंत्रज्ञानाचा वापर वाढवून 'आत्मनिर्भर भारत' अभियानाला बळ देण्यासाठी आहे. देशामध्येच विकसित झालेल्या उत्पादनांना प्राधान्य देणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
Hello everyone, I have switched to Zoho Mail. Kindly note the change in my email address. My new email address is amitshah.bjp @ https://t.co/32C314L8Ct. For future correspondence via mail, kindly use this address. Thank you for your kind attention to this matter.
— Amit Shah (@AmitShah) October 8, 2025
परदेशी सॉफ्टवेअरवरील अवलंबित्व कमी करणे
जोहो (Zoho) ही एक भारतीय कंपनी आहे, जी केवळ ई-मेलच नाही, तर डॉक्युमेंट्स, स्प्रेडशीट्स आणि प्रेझेंटेशन्ससाठी 'झोहो ऑफिस सूट' सारखी उत्पादकता साधने देखील पुरवते. सरकारी कामकाजात विदेशी सॉफ्टवेअरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हा निर्णय धोरणात्मक मानला जात आहे.
शिक्षण मंत्रालयाने यापूर्वीच आपल्या सर्व अधिकाऱ्यांना अधिकृत कामांसाठी 'झोहो ऑफिस सूट' वापरण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यामुळे डिजिटल स्वावलंबनाच्या दिशेने सरकारचा वाढता कल दिसून येतो.
काय म्हणाले अमित शहा?
केंद्रीय गृहमंत्र्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर या बदलाची माहिती दिली. त्यांनी लिहिले, "नमस्कार सर्वांना, मी आता झोहो मेलवर स्विच केले आहे. कृपया माझ्या ई-मेल ॲड्रेसमधील बदलाची नोंद घ्यावी. माझा नवीन ई-मेल ॲड्रेस amitshah.bjp@zohomail.in हा आहे. भविष्यातील सर्व पत्रव्यवहारासाठी कृपया याच पत्त्याचा वापर करावा. या महत्त्वपूर्ण बाबीकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद."
अमित शहा यांच्यापूर्वी केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही 'झोहो मेल'वर स्विच करण्याची घोषणा केली होती. देशाच्या प्रमुख नेत्यांनी स्वदेशी तंत्रज्ञानाला दिलेला हा पाठिंबा भारतीय टेक उद्योगासाठी आणि 'झोहो' कंपनीच्या विकास पथकासाठी मोठा उत्साहवर्धक आहे.