Wednesday, October 8, 2025

'दशावतार' चित्रपटाचे रिषभ शेट्टीने केले कौतुक! म्हणाला, असे चित्रपट पुढील पिढीसाठी दस्ताऐवज आहेत

'दशावतार' चित्रपटाचे रिषभ शेट्टीने केले कौतुक! म्हणाला, असे चित्रपट पुढील पिढीसाठी दस्ताऐवज आहेत

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक रिषभ शेट्टी सध्या आपल्या कांतारा चॅप्टर १ या नवीन चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्या कांतारा चित्रपटाप्रमाणेच कांतारा चॅप्टर १ हा चित्रपटसुद्धा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतोय. दरम्यान कांतारा चॅप्टर १ च्या प्रचारावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्याने दशावतार या मराठी चित्रपटाचे कौतुक केले.

दशावतार चित्रपटाबद्दल बोलताना रिषभ शेट्टी म्हणाला, "मी या चित्रपटाबाबत खूप ऐकले आहे. त्याचे कौतुकही होत आहे. पण,कांताराचं प्रमोशन उशिरा सुरू झाल्यामुळे मला चित्रपट बघायला वेळ मिळाला नाही. मी नक्कीच हा चित्रपट बघेन. आपली परंपरा, वनसंवर्धन याबद्दल चित्रपट तयार होत आहेत ही चांगली गोष्ट आहे. असे चित्रपट लोकांना कधीच कंटाळवाणे वाटत नाहीत. हे चित्रपट मनोरंजन करण्यासोबतच विचार करण्यास भाग पाडतात. त्यासोबत पुढच्या पिढीसाठी महत्त्वाचा दस्ताऐवज असतात".

दशावतार या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला तेव्हा अनेक नेटकऱ्यांनी चित्रपटाची तुलना कांतारा सोबत केली. कांतारा आणि दशावतार हे दोन्ही चित्रपट समाजातील वास्तविक प्रश्न मांडत आहेत. त्यांचा विषय हा जल, जंगल आणि जमीन या त्रिसुत्री भोवती फिरत असला तरी चित्रपटाचे कथानक भिन्न दिसते. सध्या हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून कोटींमध्ये कमाई करत आहेत.

Comments
Add Comment