Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

कवितेचे बीज

कवितेचे बीज

कविता असो वा गद्य, मराठीच्या अध्ययन-अध्यापनाचा संदर्भ जेव्हा जेव्हा येतो तेव्हा मला आचार्य अत्रे यांचे आत्मकथन आठवते. पदवीधर झाल्यानंतर अत्रे शिक्षकी पेशाकडे वळले. लंडन येथे शिक्षक होण्यासाठीचा डिप्लोमा पूर्ण करून अत्रे परतले नि शिक्षक म्हणून कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शालेत रुजू झाले. चाकोरीबद्ध शिक्षणात फिरत राहून झापडबंद पद्धतीने शिकणारी पिढी निर्माण होते आहे, हे अत्र्यांना जाणवले. आजच्या शिक्षकांनी अत्रे यांच्या शिक्षक म्हणून जडणघडणीचे अनुभव आवर्जून वाचायला हवेत. शालेय विद्यार्थ्यावर उच्च मानवी मूल्यांचे संस्कार होण्याकरिता आपली मराठी काय करू शकते हे अत्रे यांनी प्रयत्नपूर्वक रुजवले. ‘श्यामची आई’ या चित्रपटाची निर्मिती ही त्यांच्या प्रयत्नाचाच भाग होता. १९३० च्या दशकात प्राथमिक शाळेतील मुलांकरिता अत्रे यांनी नवयुग वाचनमाला सुरू केली. प्रौढ माणसे लिहितात तशी भाषा असेल तर मुले त्या भाषेचा आनंद घेऊ शकत नाहीत. छापील व बोजड भाषा टाळून घरगुती भाषेचा प्रयोग मुलांकरिता केला गेला पाहिजे, ही दृष्टी मुलांसाठीच्या त्यांच्या लेखनातून स्पष्टपणे दिसते. ‘फुले आणि मुले’ हे अत्रे यांचे पुस्तक याचे उत्तम उदाहरण आहे. ‘दिनूचे बिल’ ही अत्रे यांची कथा वाचून सहज डोळे भरून येतात. आईने मुलांसाठी केलेल्या गोष्टींचा हिशेब ठेवता येत नाही, हा संस्कार ज्या पद्धतीने अत्रे यांनी केला, त्याला तोड नाही. वर्गात नीरस शिकवण्यातून मुलांचा आनंद हिरावला जातो. कोरडेपणाने कविता शिकवणारे शिक्षक कवितेबद्दल नावड निर्माण करतात. निसर्गरंगात निर्माण होऊन चित्र काढणाऱ्या एखाद्या मुलाचं चित्र फाडून त्याला ठोकळ्याचे चित्र काढायला लावणारे शिक्षक मुलाच्या मनातील उमलत्या रंगसंवेदना संपवून टाकतात. ‘ कुणी बोलायचे नाही’ अशी ‘चूप बस’ मानसिकता मुलांच्या मनात निर्माण करणारे शिक्षक मुलांमधली जिज्ञासा, उत्सुकता संपवून टाकतात. मुलांना प्रश्न पडणे बंद होते कारण त्यांना फक्त प्रश्नांची उत्तरे द्यायला लावले जाते. खरे तर गोष्टीतून अध्ययन हा अध्यापनाचा उत्तम मार्ग आहे. प्रत्येक विषयात गोष्ट लपलेली असते. पण ‘गोष्ट सांगा’ असा हट्ट धरणाऱ्या मुलांना निराश केले जाते. अत्र्यांमध्ये दडलेला शिक्षक अस्सल शिक्षक होता. मुलांना उत्तम मराठी आले पाहिजे, या ध्यासातून अत्रे यांनी मुलांकरिता निर्माण केलेले शब्दविश्व अविस्मरणीय आहे. मुलांची सृजनशीलता विकसित करण्याची संधी शिक्षकांना प्राप्त होते. या संधीचे सोने करणे त्यांच्याच हाती असते. इंदिरा संतांच्या एका कवितेतील ओळींचा उल्लेख मुलांच्या भाषा शिक्षणाबाबत करावासा वाटतो. शब्द होतात खेळणी खेळवितो ओठांवर ध्यानीमनी जे जे त्याला देऊ पाहतो आकार काही सुबक रंगीत काही पेलती मुळी न काही जोडतो तोडतो पाहतोही वाकवून मुलांचा वयाच्या बारा वर्षांपर्यंतचा काळ हा प्रचंड वेगाने शिकण्याचा काल असतो. या काळात मेंदूतील भाषा ग्रहण करण्याची केंद्रे अतिशय सजग व कार्यक्षम असतात. भाषा ऐकणे व ती बोलणे या गोष्टींना वयाच्या या टप्प्यावर भरपूर वाव मिळाला, तर मुलांचे भाषेचे आकलन सुलभ होते. यादृष्टीने मुलांच्या मेंदूतील भाषाग्रहण यंत्रणेला शाळांमधून किती वाव मिळतो याचा विचार करणे गरजेचे आहे. कवितेचे आणि भाषेचे बीज जर योग्य वयात रुजले तर संवेदनशील माणसाची जडणघडण अधिक वेगाने होईल यात शंका नाही.

Comments
Add Comment