Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

पंतप्रधान मोदींचा मुंबईत जोरदार 'प्रहार'! 'नाव न घेता' उद्धव ठाकरेंना दिला मोठा 'झटका'

पंतप्रधान मोदींचा मुंबईत जोरदार 'प्रहार'! 'नाव न घेता' उद्धव ठाकरेंना दिला मोठा 'झटका'

मेट्रो प्रकल्प रोखला; मुंबई हल्ल्यावरून काँग्रेसवरही केला घणाघात

नवी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (NMIA) पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पार पडले. या ऐतिहासिक सोहळ्यात पंतप्रधानांनी केवळ नवी मुंबईकरांचे अभिनंदन केले नाही, तर लोकनेते दि. बा. पाटील यांच्या आठवणींनाही उजाळा दिला. यासोबतच त्यांनी आपल्या भाषणात थेट विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. विशेषतः आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या काँग्रेससह इतर घटक पक्षांवर नाव न घेता सडकून टीका केली.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसारख्या प्रतिष्ठेच्या निवडणुका तोंडावर असताना, पंतप्रधान मोदी यांनी केलेली टीका राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

नाव न घेता ठाकरेंना लक्ष्य

मुंबई मेट्रो लाईन-३ चा संदर्भ देत पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, "आज ज्या मेट्रो लाईनचं लोकार्पण झालं आहे, हे त्या लोकांच्या कारनाम्यांची आठवण करून देतं. मी त्याच्या भूमिपूजन समारंभात सहभागी झालो होतो, तेव्हा मुंबईतील लाखो कुटुंबांना आशा होती की त्यांच्या अडचणी कमी होतील. पण काही काळासाठी जे सरकार आले, त्यांनी हे कामच रोखून टाकले. त्यांना सत्ता मिळाली, पण त्यामुळे देशाचे हजारो कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाले."

या विधानाद्वारे त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मेट्रो-३ कारशेडच्या कामात झालेल्या दिरंगाईवरून थेट उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले, ज्यामुळे देशाचे आर्थिक नुकसान झाल्याचा त्यांनी गंभीर आरोप केला.

मुंबई हल्ल्यावरून काँग्रेसवर घणाघात

याच वेळी पंतप्रधान मोदींनी २००८ च्या मुंबई हल्ल्यावरून (२६/११) काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याचा उल्लेख केला, जे देशाचे गृहमंत्री राहिले आहेत. ते म्हणाले, "काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने एका मुलाखतीत खूप मोठा खुलासा केला आहे. मुंबई हल्ल्यानंतर आपले सैन्य पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी पूर्णपणे तयार होते. संपूर्ण देशाचीही त्यावेळी तीच भावना होती. पण, त्या काँग्रेस नेत्याच्या आईने कुठल्या तरी दुसऱ्या देशाच्या दबावामुळे, काँग्रेस सरकारने भारतीय सैन्याला पाकिस्तानवर हल्ला करण्यापासून रोखले होते."

पंतप्रधान मोदींनी या घटनेवरून काँग्रेस पक्षावर शरणागती पत्करल्याचा थेट आरोप केला. "मुंबई हल्ल्यात संपूर्ण देश हादरला असताना, यूपीए सरकारने दहशतवाद्यांसमोर शरणागती पत्करली," असे ते म्हणाले. "कोणत्या परदेशी शक्तीने भारतीय सैन्याला कारवाई करण्यापासून रोखले?" असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. "आजचा भारत शांत बसून राहणार नाही आणि आता त्याच भाषेत दहशतवाद्यांना उत्तर देईल," असे त्यांनी ठामपणे सांगितले. राष्ट्रीय भावनांशी त्यावेळी छेडछाड का केली गेली, असा गंभीर प्रश्न विचारून पंतप्रधानांनी आपले भाषण संपवले.

Comments
Add Comment