Wednesday, October 8, 2025

प्रेमानंद महाराजांची प्रकृती खालावली; व्हिडिओ पाहून भक्त भावूक

प्रेमानंद महाराजांची प्रकृती खालावली; व्हिडिओ पाहून भक्त भावूक

मुंबई : वृंदावनचे संत प्रेमानंदजी महाराज यांचा एक व्हिडिओ अलीकडेच त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला असून, यात त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली दिसत आहे. या व्हिडिओमध्ये महाराज प्रवचन देत असताना त्यांच्या चेहऱ्यावर थकवा, सूज आणि लालसरपणा स्पष्टपणे दिसून येतो. डोळे उघडे ठेवणेही त्यांना अवघड जात असून, बोलतानाही त्यांच्या आवाजात कंप दिसून येतो. हे दृश्य पाहून त्यांच्या भक्तांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

महाराज या व्हिडिओत म्हणताना दिसतात, "ही एक सवय झाली आहे. कितीही त्रास झाला तरीही हा मार्ग सोडवत नाही. देवाच्या स्मरणाशिवाय मनाला शांतता मिळत नाही. देव प्रसन्न होतो तो आपल्या परिश्रमांमुळे, आळशीपणामुळे नव्हे."

या शब्दांनी भक्तांच्या भावना अधिकच तीव्र झाल्या आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर त्यांच्यासाठी प्रार्थना करत विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. काहींनी म्हटले आहे की, "महाराजांचा चेहरा पाहून नेहमी आनंद मिळतो, पण आज त्यांना अशा अवस्थेत पाहून डोळे भरून येत आहेत."

प्रेमानंद महाराज दीर्घकाळापासून पॉलीसिस्टिक किडनी डिसीज या आजाराशी लढा देत आहेत. या आजारात किडनीमध्ये अनेक गाठी निर्माण होतात आणि हळूहळू किडनीची कार्यक्षमता कमी होऊ लागते. त्यांना नियमित डायलिसिस करावे लागते. त्यांच्या दोन्ही किडनींवर याचा परिणाम झाला आहे. महाराजांना या आजाराची माहिती आधीपासून असूनही त्यांनी आपला प्रवचन मार्ग सोडलेला नाही. अनेक भक्तांनी त्यांना किडनी दान करण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती.

आरोग्याच्या कारणास्तव त्यांचे फिरायला जाणे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याचे आश्रमाने आधीच जाहीर केले होते. भक्तांना दर्शनासाठी रस्त्यावर महाराजांची वाट पाहू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा