Wednesday, October 8, 2025

हिंदूच्या भावना दुखावल्यामुळे ‘मनाचे श्लोक’ चित्रपटाला विरोध!

हिंदूच्या भावना दुखावल्यामुळे ‘मनाचे श्लोक’ चित्रपटाला विरोध!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या विविध सामाजिक आणि कौटुंबिक विषयांवर आधारित चित्रपटांच्या निर्मितीचा कल वाढला आहे. या प्रवाहात अभिनेत्री मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मनाचे श्लोक’ हा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, चित्रपटाच्या नावावरूनच वाद सुरू झाला आहे. यामुळे याच नावाने चित्रपट प्रदर्शित होईल की नाही, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड यांनी चित्रपटाच्या नावावर आक्षेप नोंदवला आहे. ‘मनाचे श्लोक’ हे रामदास स्वामींनी लिहिले होते. मनावर चांगले संस्कार व्हावे या हेतूने ही रचना रामदास स्वामींनी केली होती. आजही महाराष्ट्रात अनेक विद्यार्थी मनाचे श्लोक म्हणतात, अशा वेळी ‘मनाचे श्लोक’ या नावाचा वापर मनोरंजनासाठी करणे अयोग्य वाटते; अशी भावना मंडळाने व्यक्त केली आहे. त्यांनी चित्रपट निर्मात्यांकडे नाव बदलण्याची मागणी केली असून, ती मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

हा चित्रपट मानवी नातेसंबंध, प्रेम, लग्न यांसारख्या भावनिक विषयांवर आधारित असून, मृण्मयी देशपांडेने दिग्दर्शन आणि लेखनाचे काम सांभाळले आहे. मृण्मयीसोबत राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे, करण परब, तसेच लीना भागवत, मंगेश कदम आणि शुभांगी गोखले हे कलाकार झळकणार आहेत.

चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यापासूनच त्याची चर्चा रंगली होती. मृण्मयीने यामधील कथानकाबाबत बोलताना सांगितले की, ‘मनाचे श्लोक’ ही गोष्ट आहे ‘मनवा’ आणि ‘श्लोक’ या दोन व्यक्तिरेखांभोवती फिरणारी. त्यांच्या नात्यातून प्रेक्षकांना अनेक ओळखीच्या भावना आणि विचारांचा प्रत्यय येईल.

सध्या चित्रपटाच्या नावावरून उठलेल्या या वादावर चित्रपटाच्या टीमकडून अथवा मृण्मयी देशपांडे हिच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप देण्यात आलेली नाही. मात्र, १० ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, आणि त्याआधी या नावाच्या मुद्यावर तोडगा न निघाल्यास चित्रपट प्रदर्शनाचे नियोजन अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment