मुंबई:लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून मराठवाड्यातील पुरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ५० लाखाचा चेक राज्य सरकारकडे सुपूर्द करण्यात आला. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा चेक सुपूर्द केला. यावेळी लालबागचा राजा मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे आणि पदाधिकारी उपस्थित होते.
मराठवाड्यात आलेल्या पूरामध्ये तेथील शेतकऱ्याचे जनजीवन उद्धवस्त झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या मदतीसाठी लालबागचा राजा मंडळ धावून आले आहे. याआधीही अनेक संस्थानांनीही शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
राज्य सरकारनेही मंगळवारी शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केली आहे. हाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीपिकांसह, घरे आणि जमिनींचेही अतोनात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने आज बळीराजाला मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांसाठी तब्बल ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे मोठे मदत पॅकेज जाहीर केले आहे.