
महापालिका निवडणुका आता काही महिन्यांवर आल्या आहेत. महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी सत्ताधारी भाजपने आतापासूनच तयारीला सुरुवात केली असून, मित्रपक्षांसह आघाडीतील अनेक दिग्गजांना पक्षात घेण्याकरिता यश मिळवले आहे. येत्या काही दिवसांतच सर्वांचे पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग होणार आहे हे निश्चित आहे.
महापालिकांच्या गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या निवडणुका आता डिसेंबर-जानेवारी महिन्यात होणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यानुसार आता सर्वच राजकीय पक्षांनी आणि इच्छुकांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र येऊन महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविणार की निवडणुकांना स्वतंत्रपणे सामोरे जाणार यासंबधीचे चित्र अद्याप अस्पष्टच आहे. मात्र, २०१७ ला महापालिकेत तब्बल ९७ जागा जिंकून एकहाती सत्तेत आलेल्या भाजपने आता पुन्हा स्वबळावर सत्तेत येण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी २०१७ चा फॉर्म्युला पुन्हा वापरला जाणार असून, पुन्हा एकदा विरोधी पक्षातील मातब्बरांना पक्षात घेण्यासाठी फिल्डिंग लावण्यात येत आहे. त्याचा सर्वाधिक फटका सत्तेत मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला बसण्याची शक्यता असून, अनेक प्रभागांमध्ये राष्ट्रवादीचे काही दिग्गज इच्छुक गळाला लावण्यात भाजपने यश मिळविले असल्याचे सांगण्यात येत आहे. लवकरच या सर्व इच्छुकांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगण्यात आले.
महापालिका निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने एकूण ४१ प्रभाग तयार झाले आहेत. त्यानुसार १६५ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. गत निवडणुकीत भाजपचे ९७ नगरसेवक निवडून आले होते. ११ समाविष्ट गावांच्या समावेशानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत दोनपैकी भाजपचा एक नगरसेवक निवडून आला होता. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांची संख्या ९८ झाली होती. त्यातच कार्यकाळ संपल्यानंतर शिवसेनेच्या ५ माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे थेट १०४ जागांवर भाजपचा आता दावा असणार आहे. मात्र, या वेळेस भाजपने थेट १२५ जागांचे टार्गेट ठेवले असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसचा माजी नगरसेवकही भाजपच्या वाटेवर आहे, तर शिवसेनेच्या दोन माजी नगरसेवकांपैकी नक्की कोणाला पक्षात घ्यायचे, हे अद्याप निश्चित होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. पर्वती मतदारसंघात काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या माजी पदाधिकाऱ्यांचाही प्रवेश निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा या पक्ष प्रवेशाला अद्याप ग्रीन सिग्नल मिळाला नसला, तरी निवडून येण्याची क्षमता या निकषात संबधित पदाधिकाऱ्यांना भाजपचे दरवाजे उघडले जातील अशीच चर्चा आहे. सर्वाधिक मोठा धक्का वडगाव शेरी मतदारसंघात बसण्याची शक्यता आहे. येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांच्या चिरंजिवांच्या पक्षप्रवेशाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, स्वत: आमदार आणि त्यांच्या चिरंजीव या केवळ अफवा असल्याचे सांगत आहेत. मात्र, ही चर्चा प्रत्यक्षात खरी ठरल्यास पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा फटका बसून भाजपसाठी मोठी जमेची बाजू ठरू शकणार आहे. या शिवाय तुतारीकडे असलेली एक माजी नगरसेविका भाजप प्रवेशासाठी इच्छुक असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप त्यांना ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. आमदार पुत्राच्या प्रवेशाची चर्चा सुरू असताना त्याला मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसून येत आहे. आपण समोर येऊन बोलावं तर पक्षाची शिस्त मोडली जाईल. या भीतीने कार्यकर्ते बोलत नाहीयेत. संधीसाधू लोक पक्षात घेऊन पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे काय असा प्रश्नदेखील यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
संबंधित प्रभागातील राजकीय गणिते आणि निवडणुकीचा सर्व्ह? लक्षात घेऊनच आगामी काळात यासंबंधीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. याशिवाय मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक माजी नगरसेवक आणि ज्या प्रभागात भाजपचे मजबूत उमेदवार नाहीत, अशा प्रभागांमधील इच्छुकांना पक्षात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी संबंधितांबरोबर चर्चाही झाल्या असून, निवडणुकीतील युतीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर त्यावर पुढील कार्यवाही होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हडपसर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांना भाजपने अशाच पद्धतीने टार्गेट केले असल्याचे सांगितले जात आहे.
कोथरूड, वडगाव शेरी अन् पर्वती टार्गेटवर कोथरूड हा भाजपचा सर्वात मजबूत बालेकिल्ला मानला जातो. मात्र, गत महापालिका निवडणुकीतही विरोधी पक्षाचे चार नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे आता सर्वच्या सर्व जागांवर भाजपचे नगरसेवक निवडून आणण्याचे नियोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला तीन पक्षांना खिंडार लावण्यात यश मिळविले असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या एका बड्या पदाधिकाऱ्यांच्या चिरंजीवांचा पक्षप्रवेश निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. अंतिम प्रभाग रचना जाहीर महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली असून ती सत्ताधारी भाजपसाठी अनुकूल आहे. आता आरक्षणाकडे इच्छुकांचे डोळे लागले आहेत.