प्रेक्षक

माेरपीस : पूजा काळे


दोन तास चाललेल्या नाटकाचा शेवट झाला. पडदा पडताच प्रेक्षागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. यावेळी चेहऱ्यावर समाधान घेऊन बाहेर पडलेल्या प्रेक्षकांमध्ये, नाटकाबद्दलची सकारात्मकता तर होतीच शिवाय पात्रांबद्दलची उत्सुकताही जाणवत होती, ज्यामध्ये आत्मियता भरली होती. तर काहींच्या मते नाटकातल्या दुसऱ्या बाजूचा विचार नसल्याचे स्पष्ट निर्देश निष्कर्ष होते. अशा तऱ्हेच्या प्रसंगात विविध पातळीवर समाजाचा दृष्टिकोन दिसतो. कंगोऱ्याच्या आतल्या जाणिवेतून वेगवेगळ्या पद्धतीने अंतर्मुख होणारे प्रेक्षक स्वत:च्या मनाला पटणाऱ्या गोष्टींची री ओढतात. बहुतेक वेळा अन्याय, अत्याचाराच्या ठिकाणी माणसांची एक जमात अगदी प्रेक्षणिय स्थळ असल्यासारखे वावरते. आपल्याला न घेणं, न देणं या तत्त्वावर बघ्यांची गर्दी लोटते. रंजनासाठी उतरलेला प्रेक्षक मनोरंजन होताच, मदतीला न धावता काढता पाय घेतो, हे असतात मतलबी प्रेक्षक. ‘कोलाहलात माणसांच्या मी हाक दिली त्वरेने, डोळे फाडून पहात राहिली माणसे कडेकडेने.’ नाटक, सिनेमा तर सोडाच पण एखाद्या घटनेचे, प्रसंगाचे आपापल्या अक्कल हुशारीने अर्थ काढले जातात. ज्यांना आपण आपले म्हणतो ते मायबाप प्रेक्षक कधी तुम्हाला उंचीवर नेतात. तर कधी धरून जमिनीवर आपटतात. हे झाले अर्थाअर्थी असलेले प्रेक्षक; परंतु वेळापत्रकात असलेल्या चोवीस तासात, बारा महिने कालात, तीनशे पासष्ट दिवसांच्या वेळेचा विनियोग आनंद आणि चरितार्थ चालवण्यासाठी म्हणजे काम, दाम, खेळ, आराम, आरोग्य, वाचन, लेखन, मनन सारख्या कोणत्याही गोष्टीसाठी केला तर उत्तमच म्हणेन मी. निरर्थकपणे वेळ टाळण्याचं काम जाणीवपूर्वक कमी केल्यास बघण्याच्या भूमिकेपेक्षा कर्तृत्वाची चढती कमान पाहण्याचं भाग्य कधीही योग्य. सरळ, साध्या, सोप्या नसलेल्या आयुष्याच्या प्रवासात दोन प्रकारची माणसे भेटतात, जी दुटप्पी भूमिकेत वावरतात. पहिले बाजूला उभे राहून आनंद घेणारे तर दुसरे स्वतः स्पर्धेत भाग घेऊन जिंकण्याचा प्रयत्न करणारे. इथे नुसते प्रेक्षक असणं म्हणजे केवळ बघ्याची भूमिका घेतलेली चालती बोलती माणसं असतात, जी काहीही न करता फक्त आणि फक्त नेत्रसुख घेतात. अशाप्रकारचे बघे लोक गाव, खेडी, शहरातील रस्ते अशा सगळ्या ठिकाणी आढळतात. जे स्वत:च्या आयुष्यातील महत्त्वाचा वेळ फुकट घालवतात. तेव्हा जीवनाचा खेळखंडोबा होण्यापूर्वी प्रेक्षक बनून खेळ बघण्याऐवजी परिस्थितीवर नजर रोखून सामोर जाण्याची इच्छा ठेवली तर कुठल्याही स्पर्धेत, खेळण्याची मजा काही वेगळीच असेल. हर खेल का अपनाही मजा है. यदि ऊसमें शामिल हुए तो लंबी रेस का घोडा बन पाओगे!


खरंतर कोणी कुठे काय करावं? हा प्रश्नच असू नये. स्पर्धेत उतरलेला स्पर्धक त्या स्पर्धेतील खेळाचा मनापासून आनंद घेतो. लक्ष लक्ष योनीतून माणसाच्या जन्माला आलो ते काही करून दाखवण्यासाठीच ना. मग चला तर तुमचं काम तुम्ही स्वत:च ठरवा आणि स्वत:च करा. कामात पहिली, दुसरी पायरी नसते. सगळ्या पायऱ्या उंचीवर नेणाऱ्या असतात. कामाचं मोल जबाबदारी घेऊनच वृद्धिंगत होतं. छोटं किंवा मोठं काम यापेक्षा काम हे काम आहे त्यातून मिळणारा आनंद कालातीत आहे. कुठल्याही पदाच्या मागणीपेक्षा अधिक क्षमतेचं काम सर्वोच्च मानलं जाईल. तेव्हा प्रयत्न करा अन्यथा बघे म्हणवत तुम्हालाही या स्पर्धेतून दूर केलं जाईल.


हर्बर्ट कॅसन म्हणतात, माणूस अज्ञानाच्या अंधारात नव्हे तर वस्तुस्थितीच्या उजेडात कृतिशील होत असतो. ती जाणणे व विचार करणे यातूनच उत्कृष्ट कार्यक्षमता निर्माण होते. सत्याला सामोर जाणं म्हणजे वस्तुस्थिती स्वीकारणं. तेव्हा हे मानवा ऊठ. जागा हो. आपण बघे बनून कुढत राहायचं की स्पर्धेत उतरायचं हे तुझ तूच ठरवं. प्रेरणेतून कृतिशील झालेला मनुष्य अचूक निर्णय घेऊ शकतो एवढी ताकद तुझ्यात आहे. अधिक प्रभावी असलेला जगातला एकमेव भरपाई करण्याचा नियम हा देणगी स्वरूपात आपल्याला लाभलाय. एकमेकांची अडनड समजून वेळेनुसार, वेळेवर सुचणारा हा नियम सतत कार्यान्वित असतो. आज तू कुणाचेही काम केलेस तर उद्या त्या बदल्यात तुझे काम होईल हे शंभर टक्के खरं; परंतु जर स्वत:चे हातच हलवले नाहीस तर बदल्यात देवही धावून यायचा नाही, काहीही न करता मेल्यासारखं जगणं म्हणजे एकेक दिवस पुढे ढकलणं हे शुद्ध मूर्खपणाचं लक्षण सांभाळत बसशील, तर शेवटपर्यंत बघ्याचं रूप घेतलेला प्रेक्षकच होऊन फिरशील.

Comments
Add Comment

वृद्धांचा सन्मान आणि सुरक्षितता

माध्यमांनी वृद्धांचे सकारात्मक योगदान आणि त्यांचे अनुभव प्रदर्शित करून समाजातील वृद्धांविषयीचे नकारात्मक

चव, चिकाटी आणि चैतन्याचा स्वाद

दी लेडी बॉस : अर्चना सोंडे नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा उत्सव. देवी अन्नपूर्णा हे त्या शक्तीचं एक रूप. अन्न देणं,

कवितेचे बीज

कविता असो वा गद्य, मराठीच्या अध्ययन-अध्यापनाचा संदर्भ जेव्हा जेव्हा येतो तेव्हा मला आचार्य अत्रे यांचे आत्मकथन

आई जगदंबे

कृपावंत जगदंबेच्या अंतरंगी वसलेली दया-माया महानवमी माळेत जीव ओतते. आई भक्ताला पावते. दैत्याबरोबर नऊ दिवस नऊ

भारताची पहिली महिला ट्रकचालक : योगिता रघुवंशी

दुर्गा माता ही भक्ती आणि शक्तीचं रूप मानलं जातं. महिला सशक्तीकरणाचे ते एक प्रतीक आहे. आजच्या काळात स्त्री चूल आणि

अनुवादाची आनंदपर्वणी

आज एका चर्चासत्राच्या निमित्ताने जुनी गोष्ट आठवली. अनुवाद विषयक एका चर्चासत्राचे आयोजन आम्ही केले होते. या