
मुंबई : फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजेच फिक्की या संस्थेसाठी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री पोलिसांच्या बुटांविषयी बोलले. यामुळे राज्यातल्या पोलिसांच्या गणवेशात बदल होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.
मुख्यमंत्र्यांशी बोलताना मुलाखती दरम्यान अक्षय कुमारने पोलिसांच्या बुटांचा विषय उपस्थित केला. मुख्यमंत्री फडणवीस हेच राज्याचे गृहमंत्री पण आहेत. पोलीस विभाग थेट त्यांच्या नियंत्रणात आहे म्हणून अक्षय कुमारने पोलिसांच्या बुटांबाबत मुख्यमंत्र्यांसमोर मुद्दा उपस्थित केला.
पोलिसांना त्याच्या कामाचा भाग म्हणून अनेकदा धावपळ करावी लागते. कायदा हाती घेणाऱ्यांना पकडण्यासाठी धावावे लागते, पाठलाग करावा लागतो. हे करताना टाचेचे बूट असल्यास धावण्याच्या वेगावर मर्यादा येतात. याउलट क्रीडापटू वापरतात तसे बूट किंवा पळण्यास मदत होईल अशा रचनेचे बूट असले तर पोलिसांना त्यांचे काम प्रभावीरित्या करण्यास मदत होईल, असे अक्षय कुमार म्हणाला. हे ऐकताच मुख्यमंत्री गंभीर झाले. त्यांनी अक्षय कुमार मांडत असलेला मुद्दा व्यवस्थित ऐकून घेतला आणि त्याला लगेच उत्तर दिले.
आतापर्यंत पोलिसांना गणवेश म्हणून जे बूट दिले जात होते त्याच बुटांचा वापर ते संचलनाच्या कार्यक्रमात करत आहेत. यामुळे पोलिसांच्या बुटांचा जास्त विचार होत नव्हता. पण अक्षय कुमारने मांडलेले मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्याने पोलिसांच्या बुटांबाबत ज्या दिशेने विचार करायला हवा असे मत मांडले ते महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. लवकरच पोलिसांना पळण्यास सोपे होईल असे बूट देण्यासाठी नियोजन करू, असे सकारात्मक उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले.
पोलिसांना उपयुक्त बुटांचे डिझाइन तयार करण्यासाठी आपले सहकार्य मिळाले तर उत्तम होईल, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी अक्षय कुमारला मदत करण्यास सांगितले. यामुळे भविष्यात वेगाने पळता येईल अशा स्वरुपाचे नव्या डिझाइनचे बूट पोलिसांना गणवेशाचा भाग म्हणून दिले जाण्याची शक्यता वाढली आहे.