
पूर्वी महिष्मती नगरीत एक श्रीमंत व्यापारी राहत होता. सदैव व्यवसायात व्यग्र असलेल्या या व्यापाऱ्याला अस्वस्थ वाटू लागलं म्हणून त्याने नगरातल्या वैद्याला बोलावलं. वैद्यांनी त्याला उपचारासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी पायी यायला सांगितलं. त्याप्रमाणे व्यापारी दुसऱ्या दिवशी पहाटे चालत वैद्यांकडे गेला आणि म्हणाला, ‘मला अस्वस्थ वाटत आहे. आपण लवकर औषध द्या. मला पुष्कळ कामं आहेत.’ त्यावर वैद्य म्हणाले, ‘तुझी सगळी कामं उरकून, नदीवर स्नान करून माझ्याकडे परत ये.’ त्यानुसार व्यापारी परत वैद्यांकडे आला. थकून आलेल्या व्यापाऱ्याला वैद्यांनी ताजी न्याहारी खायला दिली. नंतर जवळच्या उद्यानात, झोपाळ्यावर बसून वैद्यांनी व्यापाऱ्याची विचारपूस करायला सुरवात केली. वैद्यांशी बोलता बोलता व्यापाऱ्याला झोप लागली. काही काळानं जागं झाल्यावर संकोचलेल्या व्यापाऱ्यानं क्षमा मागितली आणि खूप दिवसात अशी शांत झोप अनुभवली नाही असं म्हणाला. माझ्या अस्वास्थ्याकरता उपचार काय असं विचारल्यावर वैद्य म्हणाले, ‘उपचार तर पूर्ण झाले आहेत.’ व्यापाऱ्याला आश्चर्य वाटलं. त्यावर वैद्य म्हणाले सकाळच्या कोवळ्या उन्हातला विहार, सात्त्विक अन्न आणि योग्य विश्रांती हेच आपलं औषध आहे.
कामाच्या धबडग्यात व्यापारी योग्य आहार, विहार आणि विश्रांती ही आरोग्यासाठी उपयुक्त असलेली तीन सूत्रं विसरला होता. वैद्यांनी त्याला केवळ त्यांची आठवण करून दिली आणि अनुभवही दिला.सध्याच्या काळात आपलं जगणं काही व्यापाऱ्यापेक्षा वेगळं नाही. शरीरस्वास्थ्यासाठी आवश्यक असलेली आहार, विहार आणि विश्रांती ही त्रिसूत्री आपण विसरलो आहोत. स्वास्थ्य म्हणजे नेमकं काय? केवळ शरीर सुदृढ असलं म्हणजे स्वास्थ्य आहे असं म्हणता येतं का? या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी स्वास्थ्य शब्दाचा नेमका अर्थ पाहू. स्वास्थ्य शब्दात मूळ शब्द ‘स्वस्थ’ असा आहे. स्वस्थ शब्दाची व्युत्पत्ती 'स्वस्मिन् तिष्ठति' म्हणजे स्वतःमध्येच स्थिर असणं अशी आहे. जो शरीरानं आणि मनानंही दृढ आणि स्थिर आहे तो स्वस्थ. नेहमी स्वस्थ असण्याची ही अवस्था म्हणजे स्वास्थ्य. थोडक्यात, स्वास्थ्य म्हणजे शारीरिक आणि मानसिक स्थैर्य. प्रस्तुत लेखात आपण शारीरिक स्वास्थ्याचा विचार करणार आहोत. शारीरिक स्वास्थ्य प्रामुख्यानं तीन सूत्रांवर आधारित आहे. आहार, विहार, आणि विश्रांती.
१. आहार : आहाराविषयी विवेचन लेख क्रमांक ५ मध्ये केलं आहे. तरीही थोडक्यात सांगायचं तर आहार सात्त्विक म्हणजे ताजा, आनंददायी, शरीराकरता पोषक असावा. सीमित म्हणजे योग्य प्रमाणात असावा. आपल्या खाण्याच्या क्षमतेच्या अर्धा भाग अन्न, पाव भाग पाणी आणि पाव भाग वायुसंचारासाठी मोकळा असावा. आहार संतुलित म्हणजे गोड, तिखट, कडू, तुरट, आंबट आणि खारट या सहा रसांचं योग्य प्रमाण असलेला, योग्य प्रमाणात जीवनसत्त्वं, प्रथिनं, कर्बोदकं इत्यादींनी युक्त असावा.
२. विहार : स्वास्थ्यासाठी आहाराला विहाराचीही जोड द्यायला हवी. विहार शब्दाचा अर्थ फिरणं तसेच खेळ, क्रीडा असाही आहे. दररोज नियमितपणे चालणं हा व्यायाम आहेच पण विहार शब्दाचा अर्थ व्यापक दृष्टीनं लक्षात घेतला तर शरीर सुदृढ राहण्यासाठी शरीराच्या योग्य हालचाली म्हणजेच व्यायाम करण्यालादेखील विहार म्हणता येईल. वस्तुतः दररोज आपण घरातील, कार्यालयातील अनेक कामं पार पाडत असतो. तेव्हा आपले भरपूर शारीरिक श्रम होतात; परंतु ते व्यायाम (Exercise) नसून परिश्रम (Exertion) असतात. परिश्रमांमुळे थकवा येतो. मात्र चालणं किंवा योगासन करणं अशा व्यायामामुळे थकवा दूर होऊन ताजतवानं वाटतं. असे व्यायाम करणं म्हणजे विहार होय. व्यायामामुळे शरीर स्वास्थ्याबरोबरच आनंदही मिळतो. म्हणूनच दिवसातून थोडा वेळ तरी विहारासाठी राखून ठेवणं आवश्यक आहे.
३. विश्रांती : शारीरिक स्वास्थ्याचं तिसरं सूत्र म्हणजे विश्रांती. भरपूर वेळ झोप घेणं किंवा काहीही हालचाल न करणं म्हणजे विश्रांती नाही. उलट अधिक झोप घेतली तर अधिक आळस येतो, काम करण्यासाठी ऊर्जा आणि उत्साह राहात नाही. म्हणून योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात निद्रा घेणं, काम करताना काही क्षण शांत बसणं म्हणजे विश्रांती होय. विश्रांतीनं आळस न येता काम करायचा उत्साह वाढतो. रात्री आठ तास झोप घेणं आरोग्याच्या दृष्टीनं आवश्यक आहे. योग्य प्रमाणात घेतलेल्या निद्रेमुळे शरीराची झीज भरून निघतेच पण मनही कामं करण्यासाठी ताजतवानं होतं. योग आणि शारीरिक स्वास्थ्याचा घनिष्ठ संबंध आहे. योगासनं करताना ठराविक क्रमानं, संथ गतीनं आपल्या क्षमतेनुसार शरीराच्या योग्य हालचाली करून आसनाची अंतिम स्थिती गाठली जाते. या हालचाली लक्ष देऊन केल्यामुळे मनाची एकाग्रता वाढते. मन शांत होतं. प्रत्येक आसनानंतर काही क्षण विश्रांती घ्यायची असते त्यामुळे आसनांमध्ये कृती आणि विश्रांती यांचं योग्य संतुलन असतं. योगामध्ये शिथिलीकरणाला महत्त्व आहे. म्हणूनच योगासनं केल्यानंतर उत्साह वाटतो. स्नायू शिथिल होतात. दीर्घकाळ योगसाधना केल्यानं मनावरही नियंत्रण येतं ज्यामुळे आपोआपच आहारही नियंत्रित व्हायला मदत होते. अशा रीतीनं शरीर स्वास्थ्याची त्रिसूत्री योगसाधनेद्वारे सिद्धीस नेता येते.