
लांबलेल्या पावसाचा कोकणातील आंबा उत्पादनावर परिणाम
रत्नागिरी (वार्ताहर) : यंदा पावसाने मुक्काम वाढविला आहे. या लांबलेल्या पावसाचा परिणाम कोकणातील आंबा उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात हापूसची पहिली पेटी बाजारात येते. मात्र यावर्षी फेब्रुवारी-मार्चपर्यंत हापूसची प्रतीक्षा करावी लागेल, असे आंबा उत्पादकांकडून सांगण्यात येत आहे. या वर्षीही आंबा पिकावर हवामानाचा परिणाम होण्याची शक्यता असून आंबा उत्पादकांसाठी ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे यावर्षी खवय्यांना हापूस आंब्याची चव उशिराच चाखायला मिळणार आहे.
आंबा हे कोकणातील प्रमुख पारंपरिक बागायती पीक आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आंब्याची मोठ्या प्रमाणात लागवड आहे. आंबा उत्पादनात हापूस आंब्याला विशेष महत्त्व आहे. आंबा पिकाची हेक्टरी उत्पादकता २.५० मेट्रिक टन आहे. कोकणातील खास करून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूस हा जगप्रसिद्ध आहे.
सुमारे २५ हजार मेट्रिक टन हापूस निर्यात होतो. दरवर्षी युरोपियन देशांसह दुबई, सिंगापूर आणि मध्य आशियातील इतर देशांमध्येही हापूस आंब्याची निर्यात होते. पणन मंडळाच्या सुविधांचा वापर करून अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, न्यूझीलंड, मलेशिया इ. देशांमध्ये आंबा निर्यात होतो. कोकणातील आंबा उत्पादनाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या काही वर्षात महत्त्व वाढले आहे. मात्र हाच हापूस आंबा सातत्याने हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत आहे.
त्यामुळे अवेळी पाऊस, वाढते तापमान याचा परिणाम उत्पादनावर होत आहे. हवामानातील बदलांचा परिणाम आंब्याच्या उत्पादनावर आणि गुणवत्तेवरही होत आहे. आंब्याला फुले, फळे येण्यासाठी आणि निरोगी फळांमध्ये परिपक्वता येण्यासाठी विशिष्ट हवामान परिस्थितीची आवश्यकता असते. मात्र सातत्याने हवामान बदलामुळे यंदा हापूसचे पीक धोक्यात आले आहे.