Monday, October 6, 2025

तरुणाईची ‘नेल एक्सटेन्शन’ची फॅशन!

तरुणाईची ‘नेल एक्सटेन्शन’ची फॅशन!

आजच्या तरुणाईमध्ये नेल एक्सटेन्शन हा फॅशन आणि सौंदर्याचा नवा ट्रेंड झपाट्याने लोकप्रिय होत आहे. आकर्षक आणि लांबसडक नखं ही प्रत्येक मुलीची इच्छा असते, मात्र सर्वांकडे नैसर्गिकरीत्या अशी नखं नसतात. त्यामुळे नेल एक्सटेन्शन हा पर्याय मोठ्या प्रमाणावर वापरला जात आहे. यामध्ये कृत्रिमरीत्या नखं लावून त्यावर विविध प्रकारचे नेल आर्ट, डिझाईन्स आणि शेड्स केले जातात. मात्र, यासाठी योग्य तज्ज्ञांकडूनच नेल एक्सटेन्शन करून घ्यावं, कारण चुकीच्या पद्धतीने केल्यास नखांना इजा होऊ शकते. आजच्या या लेखातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नेल एक्सटेन्शनचे प्रकार, नेलची कशी काळजी घ्यायची याबद्धल सर्वकाही...

सौंदर्य तुझं : प्राची शिरकर

नेल एक्सटेन्शनचे प्रकार

१. अॅक्रेलिक नेल एक्सटेन्शन

जेव्हा नेल एक्सटेन्शन्सचा ट्रेंड बाजारात नवा होता, तेव्हा अॅक्रेलिक नेल एक्सटेन्शन्सला महिलांची सर्वाधिक पसंती मिळत होती. या प्रकारात, एक विशिष्ट पावडर आणि एका लिक्विडचे मिश्रण केले जाते. हे मिश्रण लगेचच नखांवर लावले जाते आणि हवेत ते कडक होऊन नखांचा आकार घेते. अॅक्रेलिक नेल्स त्यांच्या मजबुतीमुळे ओळखले जातात. यामुळे नखे दीर्घकाळ टिकतात आणि तुटण्याची किंवा क्रॅक होण्याची शक्यता कमी असते.

२. जेल नेल एक्सटेन्शन

जेल नेल एक्सटेंशन हे आजच्या काळात महिलांना सर्वाधिक आवडणारे एक्सटेन्शन आहेत आणि ते ट्रेंडमध्ये आघाडीवर आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे, हे एक्सटेन्शन दिसायला खूप नैसर्गिक आणि आकर्षक असतात. हे जेल नैसर्गिक नखांवर किंवा टिप्सवर लावले जाते. यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे, हे जेल यूव्ही लाईट किंवा एलईडी लाईटच्या मदतीने 'सेट' केले जाते. या प्रक्रियेमुळे जेल कडक होते आणि नखांचा आकार घेते. हे एक्सटेन्शन सहजपणे २५ ते ३० दिवस टिकू शकतात.

३. फायबरग्लास नेल एक्सटेन्शन

फायबरग्लास नेल एक्सटेन्शन्स हा एक खास प्रकार आहे, जो विशेषतः ज्या महिलांना लवचिक आणि नाजूक नखे हवी आहेत, त्यांच्यासाठी उत्तम पर्याय ठरतो. या एक्सटेन्शन्समध्ये एक जाळीदार, तंतुमय सामग्री वापरली जाते, जी नैसर्गिक नखांवर लावली जाते. ही एक्सटेन्शन्स हलकी असल्यामुळे ती नखांवर जास्त जड वाटत नाहीत. ही नखे तीन ते चार आठवडे सहज टिकू शकतात.

४. प्रेस ऑन नेल्स

ज्या महिलांना त्यांच्या व्यस्त दिनचर्येमुळे नेल एक्सटेन्शनसाठी पार्लरमध्ये जाण्यास वेळ मिळत नाही, पण त्याच वेळी एखाद्या कार्यक्रमासाठी त्वरित आकर्षक नखे हवी आहेत, त्यांच्यासाठी प्रेस ऑन नेल्स हा एक उत्तम आणि सोपा पर्याय ठरतो. प्रेस ऑन नेल्स बाजारात आजकाल मोठ्या प्रमाणावर आणि अत्यंत माफक दरात उपलब्ध आहेत. या नखांना मागच्या बाजूला चिकटवण्याचे स्टिकर्स लावलेले असतात. त्यामुळे, नैसर्गिक नखांवर ते नुसते प्रेस केले की, ते लगेच लागतात.

काळजी आणि तोटे

1 पाण्यापासून बचाव : एक्सटेन्शनला जास्त वेळ पाण्यात ठेवल्यास किंवा गरम पाण्यात ठेवल्यास ते ढीले पडू शकतात.

2 जोरदार आघातापासून बचाव : ही नखे मजबूत असली तरी, त्यावर जास्त दबाव किंवा आघात झाल्यास ती तुटू शकतात.

3 काढण्याची योग्य पद्धत : एक्सटेन्शन घरी काढण्याचा प्रयत्न करू नका. ते काढण्यासाठी नेहमी प्रोफेशनल नेल आर्टिस्टकडे जा.

4 नैसर्गिक नखांचे नुकसान : एक्सटेन्शन काढल्यानंतर किंवा फिलिंगच्या चुकीच्या प्रक्रियेमुळे नैसर्गिक नखे पातळ आणि नाजूक होऊ शकतात.

5 संसर्गाचा धोका : जर एक्सटेन्शन व्यवस्थित लावले गेले नाहीत किंवा नख आणि एक्सटेंशनमध्ये पाणी साचले, तर बुरशीचा संसर्ग होऊ शकतो.

Comments
Add Comment