संवेदनशील आणि अतिसंवेदनशील विभागात नवख्या सहायक आयुक्तांची नियुक्ती
मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतील 'सहायक आयुक्त’ संवर्गातील रिक्त पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षेअंती शिफारस केलेल्या चार सहायक आयुक्तांच्या नियुक्तीचे आदेश मागील आठवड्यात जारी करण्यात आले. परंतु यामध्ये नव्याने नियुक्त झालेल्या चार पैंकी दोन सहायक आयुक्तांची बदली चक्क अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम तसेच जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा संवेदनशील विभाग असलेल्या महापालिकेच्या बी आणि सी विभागाच्या सहायक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेच्या कार्यकारी अभियंता म्हणून प्रभारी सहायक आयुक्तांची किंवा अनुभवी सहायक आयुुक्तांची या विभागांत नियुक्ती करण्याऐवजी आयुक्तांनी त्यांची बदली थेट या संवेदनशील विभागांतच केल्यामुळे एकप्रकारे त्यांना तोफेच्या तोंडी उभे केल्याचे दिसून येत आहे.
मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या आदेशानुसार शुक्रवारी ३ ऑक्टोबर २०२५ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवडीने सहायक आयुक्त संवर्गात पदस्थापना झालेल्या आणि प्रशिक्षण कालावधी पूर्ण केलेल्या चार नवीन सहायक आयुक्तांची नियुक्ती विभागात करण्यात आली आहे.
सहायक आयुक्त संतोष गोरख साळुंके(सी विभाग), सहायक आयुक्त वृषाली पांडुरंग इंगुले (एफ दक्षिण विभाग), सहायक आयुक्त योगेश रंजीतराव देसाई (बी विभाग), सहायक आयुक्त आरती भगवान गोळेकर (आर दक्षिण विभाग) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिकेतील सहायक आयुक्त संवर्गात एकूण १४ उमेदवारांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस करण्यात आली होती. यापैकी सहा उमेदवारांची यापूर्वीच सहायक आयुक्त पदावर पदस्थापना करण्यात आली आहे. त्यानंतर या चार सहायक आयुक्तांना पदस्थापना देण्यात आली आहे.मात्र, आजवर बी आणि सी विभागांत कार्यकारी अभियंता पदावरील अभियंत्यालाच प्रभारी सहायक आयुक्तपदाचा भार सोपवला जात असे किंवा महापालिकेचा अधिकारी जो एमपीएससीद्वारे शिफारस केला गेल्यास त्यांची निवड केली जात असे.
ज्यामुळे अनुभवी अधिकारी असल्यामुळे या संवेदनशील तथा अतिसंवेदनशील विभागांमध्ये काम करणे शक्य होते. परंतु या पदावर थेट नवख्याच सहायक आयुक्तांची बदली करण्यात आल्याने त्यांना आधी वॉर्डाची भौगोलिक रचनेसह सर्व कार्यपध्दती समजून घेईपर्यंत काही महिन्यांचा अवधी जावू शकतो. त्यातच जुनी इमारत कोसळल्यास किंवा अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांवर कारवाई न झाल्यास या नवख्या अधिकाऱ्यांना टिकेचे धनी व्हावे लागणार आहे. या दोन्ही विभागांमध्ये कुणीही सेवा द्यायला तयार नसल्याने महापालिका प्रशासनाने या नवख्या अभियंत्यांच्या गळ्यात या दोन्ही प्रभागांची माळ घातल्याचे बोलले जात आहे. आधीच परिमंडळ एकमध्ये प्रभारी उपायुक्त असून त्यातच नवखे सहायक आयुक्त दिल्याने विभागाचा गाढा चालवणे प्रशासनाला काही दिवस तरी कठिण जाणार असून तक्रारदारांच्या तक्रारींचे निवारण न झाल्यास या नवख्या सहायक आयुक्तांची अवस्था बिकट होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.