
मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीकोनात शिवसेनेने आपली रणनिती आखली असून येत्या निवडणुकीत महिला मतदारच केंद्रबिंदू ठेवण्यात आला. मागील विधानसभा निवडणुकीत पुरुषांपेक्षा महिला मतदारांचा टक्का अधिक असल्याने महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत महिलांचे मतदान अधिक वाढवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात आहे. राज्यात लाडकी बहिण योजनेला यश मिळाल्यानंतर शिवसेनेकडून महिला वर्गांसाठी विविध उपक्रम राबवले जात आहे.
शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना राज्यात लाडकी बहिण योजना लागू केली होती. या योजनेच्या यशामुळे विधानसभा निवडणुकीत महिला मतदानाचा टक्का वाढला. या वाढीव मतदानाचा फायदा महायुतीच्या उमेदवारांना झाला. महायुतीचे निवडून आलेल्या २३५ आमदारांमध्ये शिवसेनेच्या ६० आमदारांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीत मुंबईत एकूण ५५.४६ टक्के मतदान झाले होते. यात महिलांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत जास्त होते. मुंबईतील ५५.९२ टक्के महिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता तर ५५.०७ टक्के पुरुष मतदारांनी मतदान केले होते. मुंबईतील ३६ पैंकी २४ विधानसभा मतदार संघात महिलांचा मतदानाचा टक्का पुरुषांपेक्षा जास्त होता. त्यामुळे यंदा महिला मतदार मुंबई महापालिका निवडणुकीचा केंद्रबिंदू असेल. आणि महिला मतदारांवर लक्ष केंद्रीत करत शिवसेनेकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत.
लाडक्या बहिणींमधील कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करणारी शिवसेनेची महामंगळागौर स्पर्धा नुकताच मुंबईत पार पडली. यात तब्बल ६००० महिलांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा सोमवारी ६ ऑक्टोबर २०२५ रोजी भारती विद्या भवन येथे गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. महामंगळागौर स्पर्धेत मागाठाणे येथील कलादर्पण गटाने प्रथम क्रमांक पटकावला. दुसरा क्रमांक भायखळा येथील शिवकन्या आणि तृतीय क्रमांक चेंबूर येथील चंद्रकोर गटाने पटकावला. “उत्सव मुंबईचा” सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धेत हनुमान सेवा मंडळाने पहिला क्रमांक पटकावला. निकदवरी लेन सार्वजनिक मंडळ (गिरगावचा राजा) आणि ताडदेव पोलीस वसाहत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (वर्दीचा राजा) यांना संयुक्तरित्या दुसरा क्रमांकाने गौरवण्यात आले. तृतीय क्रमांक भांडुप येथील कोकण मित्र मंडळ आणि शिवाजी पार्क (हाऊस) यांना संयुक्तरित्या देण्यात आला. स्पर्धांचे आयोजन शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी, शिवसेना उपनेत्या, प्रवक्त्या, माजी नगरसेविका शीतल म्हात्रे आणि शिवसेना सचिव व शिव चित्रपट सेना अध्यक्ष सुशांत शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. “उत्सव मुंबईचा” स्पर्धेत मुंबईतील ४५० गणेश मंडळांनी सहभाग घेतला होता. यात ५० गणेश मंडळांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.