
कर्तृत्ववान ती राज्ञी : उर्मिला बेडेकर - पिटकर
आजपर्यंत शेकडो कर्करुग्णांच्या आयुष्यात आशेचा किरण घेऊन येणाऱ्या, रुग्णांसोबतच त्यांच्या कुटुंबीयांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या, आजच्या आपल्या कर्तृत्ववान राज्ञी वैद्य उर्मिलाताई. केवळ आयुर्वेद चिकित्साच नाही, तर कर्करोगावरील त्यांचे संशोधन, आयुर्वेदाचे प्रशिक्षण आणि समाज जागरण यामध्ये त्यांनी केलेले कार्य, हे सर्वच क्षेत्रांमधील लोकांसाठी अनुकरणीय आणि आदर्शवत् आहे.
पूर्वाश्रमीच्या उर्मिला बेडेकर यांचा जन्म दादर येथे झाला. शारदाश्रम विद्यामंदिर व तिथल्या शिक्षकांच्या संस्कारांनी व मार्गदर्शनाने, लहानपणापासूनच सर्व स्पर्धांमध्ये त्या उत्स्फूर्तरीत्या सहभागी होत असत. दहावी बोर्डात त्या १४व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या, पुढे रूपारेल महाविद्यालयात अकरावी-बारावीचा अभ्यास पूर्ण करून, सायनच्या आयुर्वेद महाविद्यालयात बी.ए.एम.एस.साठी त्यांनी प्रवेश घेतला. प्रारंभी आयुर्वेदाबद्दल संमिश्र भावना असलेल्या उर्मिलाला, आईच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे आणि मार्गदर्शनामुळे, हळूहळू आयुर्वेदाला समर्पित होण्याची प्रेरणा मिळाली .
बी.ए.एम.एस.च्या सर्व वर्षांत मुंबई विद्यापीठात अग्रस्थान पटकावून, नंतर जामनगर आयुर्वेद विद्यापीठातून (अहमदाबाद केंद्र) त्यांनी कायाचिकित्सेत एम.डी. पदवी मिळवली. या काळात त्यांनी ‘सायटिका’वरील आयुर्वेदिक उपचार पद्धती, या विषयावर संशोधन केले. एम.डी.च्या अंतिम वर्षात 'लाभशंकर भट पुरस्कार' मिळवणे, हे त्यांच्या प्रज्ञेचे आणि मेहनतीचे प्रतीक होते. त्याकाळी अहमदाबाद येथे दंगलीचे वातावरण असायचे, एकेक महिना कर्फ्यू असणाऱ्या जागी राहून, न डगमगता जिद्दीने त्यांनी त्यांचा अभ्यास पूर्ण केला. १९९३ ते १९९६ या काळात त्यांनी गुजरातमध्ये, आयुर्वेदाने कॅन्सर बरे झालेल्या रुग्णांचा एक अभ्यासदौरा केला. या कामात त्यांचे नातेवाईक वझे काकांचे मोठे योगदान होते. या रुग्णांचे फॉलोअप, संबंधित वैद्यांकडून औषध योजना, रेकॉर्डिंग्स या साऱ्यांचे संकलन करत त्यांनी एक कॅन्सर संशोधन मोहीम उभारली.
या माहितीच्या आधारे आयुर्विद्या नावाचे एक अभ्यासमंडळ स्थापन झाले. मुंबईतील अनेक तज्ज्ञ डॉक्टर, वैद्य आणि शास्त्रज्ञांच्या मदतीने, कर्करोगाच्या आयुर्वेदिक उपचारांच्या स्वरूपावर व्यासंगी चर्चा, प्रयोग, आणि अभ्यास घडवून आणला. १९९७ पासून त्यांनी मुंबईत वैद्यकीय चिकित्सक म्हणून कार्य सुरू केले. पंचकर्म आणि कॅन्सर चिकित्सेमध्ये त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला. तसेच सोबतीने त्यांचे आयुर्वेद व्यासपीठाचे देखील कार्य चालू होते. परिसंवादांचे आयोजन करणे, जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे, उपक्रमांचे नियोजन करणे, आकाशवाणी, दूरदर्शन, मासिके, वर्तमानपत्रे अशा विविध माध्यमातून त्यांनी आयुर्वेद विषयक लेखन, मार्गदर्शन केले. अनेक रुग्णांवर केवळ औषध नव्हे, तर योगसाधना, आहारसल्ला व समुपदेशन अशा सर्वांगीण पद्धतीने त्यांनी उपचार केले. त्यांच्या सांगण्यानुसार योग आणि मनोबल टिकवणे, हे कर्करोग रुग्णांसाठी औषधाइतकेच महत्त्वाचे घटक आहेत.त्यांच्या वैद्यकीय सेवेला आणि संशोधनाला भक्कम पाठिंब्यासोबत नवीन दृष्टिकोन मिळाला, तो सासरच्या सुविद्य पिटकर कुटुंबीयांमुळे, विशेषतः त्यांच्या पती व सासूबाईंमुळे.
२००३ साली त्यांनी कर्करोग आणि आयुर्वेद या विषयावर पीएच.डी. मिळवली Cancer and Vikrut Sharirkriya with special reference to cancer of oesophagus हा त्यांच्या पीएच.डी. चा विषय होता. त्यांनी भल्लातक, वसंत कल्प, आणि इतर पारंपरिक औषधांचा कॅन्सर रुग्णांमध्ये यशस्वीरीत्या प्रयोग केला. यामध्ये बिब्बा म्हणजे भल्लातकावर आधारित भल्लातक सिद्ध घृत, अमृत भल्लातक अवलेह, Anacarnex इत्यादी औषधांचा वापर करून, अनेक रुग्णांवर प्रयोग करण्यात आले. याचे शास्त्रीय सादरीकरण पुणे, नाशिक, भोपाळ इत्यादी आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये झाले. त्यातील 'वसंत कल्पांची कॅन्सरमधील उपयुक्तता' या पेपरला बेस्ट पेपर अवॉर्ड मिळाले. बी.ए.एम.एस. नंतर काय? या आयुर्वेद व्यासपीठाच्या मुंबई शाखेच्या पुस्तकाचे त्यांनी संपादन केले. शिक्षणासोबतच व्याख्याने, कार्यशाळा आणि लेखन हे ही त्यांचे महत्त्वाचे क्षेत्र आहे. विविध नियतकालिकांतून त्यांनी ‘आयुर्वेद आणि कॅन्सर’, ‘आयुर्वेदीय आहारशास्त्र’, ‘आयुर्वेद संशोधनाची दिशा’ यांसारख्या विषयांवर लेखन केले आहे.
त्यांचा मुलगा चि•. वरुण याच्या संगोपनातील महत्त्वाच्या गोष्टी, म्हणजे त्यांनी त्याला आवर्जून मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकवले, पण सोबतीने त्याचे इंग्रजीही तितकेच अस्खलित होण्यासाठी प्रयत्न केले . तसेच मॉल संस्कृती फोफावलेल्या त्या काळात, त्यांनी त्यांच्या मुलाला गड, किल्ले, निसर्गाच्या सानिध्यात नेऊन व त्याच्यासाठी सगळ्या भाषेतील भरपूर पुस्तकांची खरेदी करून, समृद्ध विचारांची परंपरा सुपूर्द केल्याचा आनंद, त्या व्यक्त करतात. आज त्यांचा मुलगा जाहिरात क्षेत्रात उत्कृष्टरीत्या काम करत आहे.
नवीन पिढी आपल्याला हवी तशी घडवायची असल्यास, सर्वप्रथम ते बदल आपल्यामध्ये करून प्रेम, विश्वास आणि सुसंवादाने दोन्ही पिढीमध्ये समन्वय साधून, यशस्वीरीत्या पुढे जाण्याचा मोलाचा सल्ला त्या सगळ्यांना देतात. त्या आणि त्यांचे यजमान अतुल पिटकर पर्यावरण प्रेमी लेखक दिलीप कुलकर्णी यांच्यासारख्या, पर्यावरण संवर्धन करणाऱ्या व्यक्तींचे अनुकरण करून, दैनंदिन जीवनात पर्यावरण सुरक्षिततेसाठी छोट्या-छोट्या गोष्टींचा अवलंब करतात. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचे उत्तम उदाहरण, म्हणजे उर्मिलाताई यांचा संपूर्ण जीवन प्रवास.
पंचकर्म सेंटर, आयुर्वेद व्यासपीठाचे काम हे सगळं अत्यंत उच्च शिखरावर असताना, सासऱ्यांची तब्येत ठीक नसल्याने, कुटुंबाला प्राधान्य देत त्यांनी पंचकर्म सेंटर बंद केले व कन्सल्टिंग प्रॅक्टिस चालू केली; परंतु कोणती गोष्ट सोडावी लागली, याची खंत न बाळगता, त्यांनी त्यांचे मार्गक्रमण चालू ठेवले.
गेली तीन दशके सातत्याने वैद्यकीय क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या उर्मिलाताईंना २०१५ साली साण्डू फार्मास्युटिकल्सचा 'धन्वंतरी पुरस्कार' मिळाला. तसेच, २०२५ मध्ये त्यांना खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेचा मा. वा. कोल्हटकर पुरस्कार बहाल करण्यात आला. हे सर्व पुरस्कार त्यांच्या निःस्वार्थ संशोधन वृत्तीचा सन्मान आहेत. भविष्यकालीन संकल्पनांचे नियोजन करताना कोणाकडूनही आपल्याला काही मिळण्यापेक्षा, जे आपल्याकडे आहे ते इतरांना शेवटपर्यंत भरभरून देता यावं, अशी प्रार्थना त्या दररोज करत असल्याचे आवर्जून सांगतात. राहून गेलेल्या गोष्टींमध्ये गाण्याची आवड व नाट्य लेखनाचे त्यांचे स्वप्न त्यांच्या मनात रुंजी घालत आहेत. ती स्वप्न लवकरच प्रत्यक्षात साकार करण्याचा त्यांचा मानस आहे. एक संशोधक, विचारवंत, मार्गदर्शक आणि पर्यावरण प्रेमी असणाऱ्या उर्मिला ताईंनी जनमानसात आयुर्वेद एक शास्त्र म्हणून रुजविण्याचा प्रयत्न केला. पारंपरिक ज्ञानाला, आधुनिक चिकित्सा प्रणालीशी जोडण्याचा प्रयत्न केला. त्यांचे जीवन हे नव्या पिढीतील वैद्यांसाठी, आदर्श आणि दीपस्तंभासारखे आहे.
Vaishu.gaikwad78@gmail.com