
१९,६५० कोटींच्या नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान करणार उदघाटन
३७,२७० कोटींचा मुंबई मेट्रो -३ प्रकल्प देशाला करणार समर्पित
'मुंबई वन' ॲपमुळे प्रवास होणार सुपरफास्ट
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ आणि ९ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते मुंबई आणि नवी मुंबईतील अंदाजे ३७ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या दोन महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे उद्घाटन करून देशाला समर्पित करणार आहेत. या प्रकल्पांमध्ये नवी मुंबईतील नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबई मेट्रो मार्गिका-३ चा समावेश आहे.
पंतप्रधान मोदी ८ ऑक्टोबर रोजी मुंबईत दाखल होतील. दुपारी ३ वाजता ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी करतील आणि त्यानंतर लगेचच ३:३० वाजता या विमानतळाचे औपचारिक उद्घाटन करतील.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ: देशातील 'ग्रीनफिल्ड' विमानतळ
पंतप्रधान मोदींच्या 'भारताला जागतिक विमान वाहतूक केंद्र' बनवण्याच्या संकल्पनेला अनुसरून, सुमारे १९,६५० कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून (PPP) विकसित झालेले हे देशातील सर्वात मोठे 'हरित क्षेत्र विमानतळ' (Greenfield Airport) आहे.
हे विमानतळ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासोबत मुंबई महानगर प्रदेशासाठी दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून काम करेल, ज्यामुळे गर्दी कमी होण्यास मदत होईल आणि मुंबईला जागतिक स्तरावरील बहु-विमानतळ प्रणालीच्या श्रेणीत आणता येईल. १,१६० हेक्टर क्षेत्रावर पसरलेले हे विमानतळ दरवर्षी ९० दशलक्ष प्रवासी (MPPA) आणि ३.२५ दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक हाताळण्यासाठी डिझाइन केले आहे. यात स्वयंचलित प्रवासी वहन प्रणाली (APM) असेल, जी सर्व चारही टर्मिनल जोडेल. महत्त्वाचे म्हणजे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ वॉटर टॅक्सीने (जलमार्ग) जोडला गेलेला देशातील पहिला विमानतळ ठरणार आहे.
मुंबई मेट्रो 'ॲक्वा लाईन' पूर्णपणे कार्यान्वित
पंतप्रधान मोदी याच दौऱ्यात मुंबई मेट्रो मार्गिका-३ (Aqua Line) च्या अंतिम टप्प्याचे (टप्पा-२बी, आचार्य अत्रे चौक ते कफ परेड) उद्घाटन करतील, ज्यावर सुमारे १२,२०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. यासह, ३७,२७० कोटी रुपयांहून अधिक खर्चातून बांधलेली संपूर्ण मुंबई मेट्रो मार्गिका-३ देशाला समर्पित केली जाईल. मुंबईची ही पहिली आणि एकमेव पूर्णपणे भूमिगत मेट्रो मार्गिका असून ती दररोज १३ लाख प्रवाशांना सेवा देणार आहे. कफ परेड ते आरे जेव्हीएलआर पर्यंतची ही ३३.५ किमी लांबीची मार्गिका फोर्ट, काळा घोडा, मरीन ड्राईव्ह, मंत्रालय, मुंबई उच्च न्यायालय, रिझर्व्ह बँक आणि नरिमन पॉइंटसारख्या महत्त्वाच्या केंद्रांना जलद जोडणी देईल.
'मुंबई वन' ॲप: एकाच ॲपमध्ये सर्व तिकीट
पंतप्रधान या वेळी 'मुंबई वन' या एकात्मिक सामायिक गमनशीलता (Integrated Common Mobility) ॲपचाही प्रारंभ करतील. हे भारतातील पहिले असे ॲप आहे, जे मेट्रो, मोनोरेल, उपनगरीय रेल्वे आणि बस अशा ११ सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी तिकीट बुकिंगची सुविधा एकाच ठिकाणी देणार आहे. या ॲपमुळे रांगेत उभे राहण्याची गरज राहणार नाही, तसेच विलंब माहिती, पर्यायी मार्ग, जवळपासची महत्त्वाची ठिकाणे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणीबाणी सूचनांसारख्या सोयी उपलब्ध होणार आहेत.
या व्यतिरिक्त, पंतप्रधान महाराष्ट्रातील कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या पथदर्शी प्रकल्प 'स्टेप' (STEP - अल्प-मुदतीच्या रोजगार कार्यक्रम) चे उद्घाटन करतील. ४०० सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि १५० सरकारी तांत्रिक उच्च विद्यालयांमध्ये हा कार्यक्रम सुरू होणार आहे, ज्यामुळे रोजगारक्षमता वाढवण्यासाठी उदयोन्मुख तंत्रज्ञान अभ्यासक्रमांच्या २५०० नवीन प्रशिक्षण तुकड्या सुरू होतील. हे सर्व प्रकल्प मुंबई आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि दळणवळणासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरतील.