Friday, November 28, 2025

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त 'गोकुळ'चा नवा रेकॉर्ड, तब्बल इतके लाख दुधाची विक्री

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त 'गोकुळ'चा नवा रेकॉर्ड, तब्बल इतके लाख दुधाची विक्री

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,(गोकुळ) ने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दूध विक्रीत नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. यादिवशी तब्बल २० लाख २८ हजार ५२६ लिटर दूध विक्री करून गोकुळने विक्रमी कामगिरी नोंदवली. याबाबतची माहिती गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी दिली.

यावेळी गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले की, “गोकुळने आपल्या उच्च गुणवत्तेच्या व विश्वासार्हतेच्या जोरावर ग्राहकांची मन जिंकली आहेत. ग्राहकांचा विश्वास आणि दूध उत्पादकांचा सहभाग हाच आमच्या प्रगतीचा पाया आहे. भविष्यात दररोज २० लाख लिटर दूध विक्रीचे उद्दिष्ट ठेवून आम्ही वाटचाल करत आहोत.” ते पुढे म्हणाले की, आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तूप, श्रीखंड, बासुंदी, पनीर, लोणी, पेढा यासारख्या दुग्धजन्य उत्पादनांच्या विक्रीत मोठी वाढ करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या यशामध्ये दूध उत्पादक, संस्था, ग्राहक, वितरक, कर्मचारी आणि वाहतूक ठेकेदार यांचे सहकार्य मोलाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गतवर्षी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी गोकुळने १८ लाख ६४ हजार ७५९ लिटर दूध विक्री केली होती, तर यंदा विक्रीत तब्बल १ लाख ६३ हजार ७६७ लिटरने वाढ झाली आहे. गोकुळने दूध संकलन आणि विक्री या दोन्ही क्षेत्रांत सातत्याने चढता आलेख राखला असून, गुणवत्तेवर आधारित कामगिरी व ग्राहकांचा विश्वास यामुळे गोकुळने नवनवीन मानदंड प्रस्थापित केले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >