
भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक प्रश्नांवर वैर आहे. पाकिस्तानच्या कुरापतीमुळे हे वैर अधिक वाढले आहे हे जगजाहीर आहे. पण या दोन देशांत आता नव्या युद्धभूमीचा वाद सुरू झाला आहे तो म्हणजे सर खाडीवरून. हा वाद खरेतर फार पूर्वीपासूनच आहे. पण पाकिस्तानने नेहमीच सर खाडीमध्ये आपल्या हालचाली पुन्हा वाढवण्याचा प्रयत्न केला आहे आणि याच संदर्भात गुरुवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी पाकला इशारा दिला, की पाकिस्तानने तेथे आपल्या लष्करी हालचाली वाढवू नयेत. कारण त्यामुळे भारतासाठी हा मोठा धोका आहे. याचे गंभीर परिणाम भारताला भोगावे लागतील पण पाकिस्तानला त्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान सोसावे लागेल. राजनाथ यांचा इशारा केवळ पोकळ नव्हता. कारण राजनाथ यांच्या इशाऱ्यात गर्भित धमकी होती. भारत ऑपरेशन सिंदूरनंतर काय करू शकतो हे पाकने समजून घेतले पाहिजे. सर खाडी हा भाग नेमका कुठे येतो हे समजून घेतले तर लक्षात येईल, की हा भाग कच्छच्या समुद्रात म्हणजे भारत आणि पाकच्या सागरी सीमेंतर्गत येतो.
सर खाडीचा वाद हा भारत आणि पाक यांच्यात प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहे. सर खाडी प्रदेशात पाक सध्या लष्करी उभारणी करत असल्याच्या बातम्या आहेत आणि यामुळेच राजनाथ यांना वरील इशारा द्यावा लागला आहे. पाकने या आधीच्या तीन लढायांतही भारताला बेसावघ ठेवून अन्यत्र चढाई केली होती. त्या अनुभवाने भारत अगोदरच सावध झाला आहे आणि त्यामुळे राजनाथ यांचा इशारा महत्त्वाचा आहे.
सर खाडी ही गुजरातच्या कच्छच्या रणामधील चिंचोळी पट्टी आहे आणि भारताचा कच्छ प्रदेश आणि पाकिस्तानच्या सिंध प्रदेशातील सागरी सीमा बनवते. हा प्रदेश बाणगंगा म्हणून ओळखला जातो. आता त्याला सामरिक महत्त्व यासाठी आहे कारण हा प्रदेश आशियातील सर्वात मोठ्या मासेमारी केंद्रांपैकी एक आहे. या प्रदेशावर ज्याचे स्वामित्व त्याचे स्वामित्व बऱ्याच प्रदेशापर्यंत पसरते असा लौकिक आहे. पण त्यापेक्षाही हा प्रदेश भारताच्या मालकीचा आहे आणि त्यात पाक अवैध कब्जा करू पाहत आहे. राजनाथ यांनी इशारा दिला आहे तो याच अर्थाने. हजारो मच्छीमारांच्या उपजीविकेचा आधार हे क्षेत्र आहे हे जगजाहीर आहे. पण यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे येथे नैसर्गिक तेलाचे साठे आहेत, जे भारताला उपयोगी ठरू शकतात.
पण या साठ्यांवर पाकचा डोळा आहे आणि राजनाथ यांना म्हणूनच पाकला वरील इशारा द्यावा लागला आहे. सर खाडी वादाचा गाभा हा भारत आणि पाकमधील सागरी प्रदेशांतर्गत होता आणि तो वेगवेगळ्या अर्थात आहे. फाळणीनंतर कच्छ भारतात राहिला आणि सिंध पाकमध्ये गेला. १९१४ च्या ठरावानुसार हा संपूर्ण भाग बाॅम्बे प्रेसिडेन्सीचा भाग होता. पण फाळणी झाली आणि या भागाचे विभाजन झाले, पण पाकने आपला दावा सोडण्यास तयार नाही हाच राजनाथ यांच्या इशाऱ्याचा अर्थ आहे. त्यामुळे पाकला राजनाथ यानी असा कडक इशारा दिला, की भारत सर खाडी प्रश्नावर पाकचा भूगोल बदलवू शकतो असा सज्जड इशारा दिला आहे. सर खाडीमध्ये पाकने कोणतेही दुःसाहस केले तर भारत पाकच्या कोणत्याही अशा कृतीला निर्णायक उत्तर देईल अशी तंबी राजनाथ यांनी दिली आहे.
सर खाडी हा गुजरातच्या कच्छच्या रणामधील सागरी प्रदेश आहे आणि हा ९६ किलोमीटर लांबीचा खाडीचा पट्टा आहे. तेथे पाकने अलीकडेच लष्करी पायाभूत सुविधा उभारण्याचे काम सुरू केले आहे आणि त्यामुळे राजनाथ यांना याची तंबी द्यावी लागली. दोन्ही देशांनी या भागाचे वेगवेगळे अर्थ लावल्याने हा प्रश्न अद्याप सुटला नाही. तीन युद्धे झाली पण सर खाडीचा वाद तसाच राहिला. हा प्रदेश सागरी भागात असल्याने सुबत्ता आहे आणि नैसर्गिक समृद्धीने अत्यंत संपन्न असा भाग आहे. त्यामुळे पाकला या भागावर डोळा ठेवावा वाटतो. राजनाथ यांच्या इशाऱ्याचा अर्थ हा आहे, की कराचीला जाणारा मार्ग या खाडीतूनच जातो. त्यामुळे पाकने जर कोणतेही दुःसाहस केले तर भारत मग या भागाचा उपयोग करून पाकवर आक्रमण करू शकतो असा राजनाथ याच्या इशाऱ्याचा गर्भित अर्थ आहे, पाक या भागात गेल्या काही वर्षांपासून लष्करी सामर्थ्य वाढवत असल्याच्या सातत्याने बातम्या आहेत, त्यामुळे राजनाथ यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सर खाडी हे नाव माशांच्या नावावरून आले आहे आणि सर खाडीची लांबी ६८ किलोमीटर इतकी आहे. पण त्याचे सामरिक महत्त्व इतके आहे, की सागरी संपत्तीच्या मानाने ते अद्वितिय आहे आणि जैवविविधता प्रचंड आहे.
यामुळेच पाकचे या भागाकडे वाकडे लक्ष गेले आहे. पण राजनाथ यांनी वरील इशारा दिल्याने पाक आपल्या स्वभावानुसार याकडे दुर्लक्ष करून काही दुःसाहस केले तर भारत जशास तसे उत्तर देईल असे स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे पाक यावर काही समजून घेईल तर बरे. अन्यथा सर्वनाशाला त्याने तयार राहावे असा राजनाथ यांच्या इशाऱ्याचा अर्थ आहे. कच्छचा सीमा वाद सोडवण्यासाठी ब्रिटिश पंतप्रधान हेरॉल्ड यांनी १० टक्के भाग पाकला देण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यानंतरही वाद सुटलाच नाही आणि पाकने नवा वाद निर्माण केला, की पाकचे सर खाडीच्या भारताच्या बाजूकडील भागात क्षेत्र आहे. त्यानंतर १९६५ आणि १९७१ मध्ये भारत पाकमध्ये युद्ध झाले आणि पाकने कच्छच्या भागात घुसखोरी केली. पण तेव्हापासून हा वाद सुरूच आहे. पाकच्या आडमुठेपणामुळे हा वाद सुटू शकला नाही. कारण भारताने पाकचा दावा हा अतार्किक आणि बेकायदेशीर असल्याचे वारंवार पटवून दिले आहे. पण पाकला ते पटत नाही. राजनाथ यांच्या इशाऱ्यामुळे हे तर नक्की झाले आहे, की येथून पुढे भारत आणि पाक यांच्यात युद्ध पेटलेच तर यंदा युद्धभूमी ही कच्छची असेल. पाकने भारतासमोर अनेकदा गुडघे टेकले आहेत आणि कारगीलमध्ये युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतरही पाकच्या कुरापती चालूच राहिल्या आहेत. भारताने आता सर खाडी भागात गस्त वाढवली आहे आणि येथे आपल्या चौक्या उभारल्या आहेत. पण पाकला कायमचा धडा शिकवल्याशिवाय पाक स्वस्थ बसणार नाही हेच पक्के दिसते.