Tuesday, October 7, 2025

वसई-विरार पालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

वसई-विरार पालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

विरार (प्रतिनिधी): वसई-विरार महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी पालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाने अंतिम मान्यता दिली आहे. प्रभाग रचनेवर प्राप्त १६० हरकती व सूचनांवर आयोगाने निर्णय दिला असून, त्यानुसार नगर विकास विभागाकडून जाहीर करण्यात आलेली अंतिम प्रभाग रचना पालिकेने सोमवारी प्रसिद्ध केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता घेतल्या जाणार आहेत. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचना, मतदार यादी, नगराध्यक्ष तसेच अध्यक्ष पदाचे आरक्षण असा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. वसई-विरार महापालिकेने आगामी निवडणुकीसाठी प्रभागांचा प्रभाग रचना प्रारूप आराखडा तयार करून प्रसिद्ध केला होता. या प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना नोंदविण्यासाठी २२ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली होती.

या मुदतीत महापालिकेकडे १६० हरकती व सूचना नोंदविण्यात आल्या. प्राप्त हरकती व सूचनांवर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात महापालिकेच्या सभागृहात सुनावणी घेण्यात आली होती. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव के. सूर्यकृष्णमूर्ती यांनी ३ ऑक्टोबर रोजी वसई-विरार पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पालिकेने सादर केलेल्या प्रभाग रचनेस मान्यता दिल्याचे पत्र नगरविकास विभागाला दिले आहे. त्यानुसार पालिकेने सोमवारी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली आहे.

Comments
Add Comment