
मुंबई : महाराष्ट्रातल्या युतीत मोठा भाऊ म्हणून बाळासाहेब ठाकरेंना कायम मान मिळाला. पण त्यांचेच पुत्र असलेल्या उद्धव ठाकरेंचे राजकारण वेगळ्या दिशेने जात आहे. एकेकाळी बाळासाहेबांच्या आवाजाने मुंबई बंद होत होती. आता उद्धव ठाकरेंनी आग्रही मागणी केली तरी आघाडीतले इतर घटक पक्ष त्याला वाटाण्याच्या अक्षता लावत आहेत.
राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अर्थात मनसेला महाविकास आघाडीत म्हणजेत मविआत सहभागी करुन घ्यावे असा उद्धव यांचा आग्रह आहे. पण काँग्रेसने मविआला नव्या सहकाऱ्याची आवश्यकताच नाही या शब्दात उद्धव यांचा प्रस्ताव केराच्या टोपलीत फेकला आहे. यामुळे मनसे वरुन मविआत वादावादी सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. आधी ग्रामीण भागातील निवडणुका आणि नंतर महानगरपालिकांच्या निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपसह सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. दुसरीकडे मविआत मनसेवरुन मतभेद निर्माण झाले आहेत.
परराज्यांतून रोजगारासाठी आलेल्यांना मारहाण करणाऱ्या मनसेसोबत आघाडी करायची नाही अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. त्यांनी मनसेला मविआत सहभागी करुन घेण्यास जाहीर विरोध दर्शविला आहे. कोणत्या निवडणुकीत कोणाकोणाला उमेदवारी द्यावी याचे निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक पातळीवरील नेत्यांना दिल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ म्हणाले. त्यांनी मनसेला सहभागी करुन मविआतील घटक पक्षांच्या लढण्याच्या जागा कमी करण्यास जाहीर विरोध केला आहे.
मागील तीन महिन्यांत उद्धव आणि राज ठाकरे वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने वारंवार एकत्र येत आहेत. यामुळे ठाकरे बंधूंचे पक्ष निवडणुकीआधीच युती करणार असल्याची जोर धरू लागली. पण काँग्रेसने मनसेला मविआत घेण्यास जाहीर विरोध केला आहे.