Tuesday, October 7, 2025

अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांकडून तब्बल ३१,६२८ कोटींची मदत; २५३ तालुक्यांना सरसकट मदत देणार

अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांकडून तब्बल ३१,६२८ कोटींची मदत; २५३ तालुक्यांना सरसकट मदत देणार

'खरडून गेलेल्या जमिनीला' मिळणार हेक्टरी ३.४७ लाखांची मदत; शेतकरी, घरे आणि जनावरांसाठी भरीव निधी

मुंबई: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीपिकांसह, घरे आणि जमिनींचेही अतोनात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने आज बळीराजाला मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांसाठी तब्बल ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे मोठे मदत पॅकेज जाहीर केले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून अतिवृष्टीग्रस्त शेतकरी या पॅकेजच्या प्रतीक्षेत होते. विशेषत: मुख्यमंत्र्यांनी दिवाळीपूर्वीच मदतनिधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, असे आश्वासन दिल्याने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. दिवाळी सणाला आता काही दिवसच उरले असताना, राज्य सरकारने हे मोठे मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे.

खरडून गेलेल्या जमिनीसाठी मोठी भरपाई

या पॅकेजमधील सर्वात मोठी घोषणा जमीन वाहून गेलेल्या शेतकऱ्यांसाठी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, "ज्या शेतकऱ्यांची जमीन अतिवृष्टीच्या पाण्यात वाहून गेली किंवा खरडून गेली आहे, त्यांना हेक्टरी ४७ हजार रुपयांची रोख नुकसान भरपाई आणि हेक्टरी ३ लाख रुपयांची मदत नरेगाच्या माध्यमातून देण्यात येईल." यामुळे, जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना मिळणारी एकूण मदत जवळपास हेक्टरी ३.४७ लाख रुपये इतकी असणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, राज्यात अतिवृष्टीमुळे ६८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, २९ जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे आणि २०५९ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, मंत्रिमंडळ बैठकीत २५३ तालुक्यांना सरसकट मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पिकांसाठी जाहीर झालेली विशेष मदत (विमा व्यतिरिक्त)

शेतकऱ्यांना रब्बीचे पीक घेण्यासाठी बियाणे आणि अन्य खर्चाकरिता मदत मिळावी, या उद्देशाने सरकारने पिकांच्या नुकसानीसाठी विशेष भरपाई जाहीर केली आहे:

  • रब्बीचे पीक घेण्यासाठी प्रती हेक्टरी १० हजार रुपये मदत.
  • हंगामी बागायती शेतीच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी २७ हजार रुपये.
  • बहुवार्षिक बागायती शेतीच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी ३२ हजार रुपये.
  • विमा न उतरवलेल्या कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी ३५ हजार रुपये आणि विमा उतरवलेल्या बागायती शेतीला ५० हजार रुपयांहून अधिक मदत मिळेल. विमा व्यतिरिक्त सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी १७ हजार रुपये इतकी भरीव मदत दिली जाईल.

घरे, जनावरे आणि इतर नुकसानीसाठी भरीव निधी

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, हे पॅकेज केवळ शेतीसाठी नाही, तर नुकसानग्रस्त घरे, जमिनी आणि जनावरांच्या नुकसानीसाठीही आहे.

  • गाळ भरलेल्या विहिरी स्वच्छ करण्यासाठी ३० हजार रुपये मदत.
  • ज्यांची घरे पूर्णपणे नष्ट झाली आहेत, त्यांना आता प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून नव्याने घरे बांधण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
  • डोंगरी भागातील ज्या घरांचे नुकसान झाले आहे, त्यांना १० हजार रुपयांची अधिकची मदत मिळेल.
  • दुधाळ जनावरांच्या नुकसानीसाठी ३७ हजार रुपयांपर्यंत मदत.
  • कुकुटपालनासाठी प्रति कोंबडी १०० रुपये मदत.
  • नुकसान झालेल्या झोपड्या आणि गोठ्यांसाठी तसेच दुकानदारांनाही ५० हजार रुपयांपर्यंत मदत दिली जाईल.
  • याशिवाय, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कातही माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एकूणच, राज्य सरकारने जाहीर केलेले हे पॅकेज आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या पॅकेजपैकी एक आहे. या पॅकेजमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीची रोख मदत मिळेलच, पण त्याचबरोबर त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी आणि पुढील हंगामात शेती करण्यासाठी भरीव आर्थिक आधार मिळेल, अशी अपेक्षा आहे.

Comments
Add Comment