
मुंबई : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आपल्या मिश्कील शैलीसाठी प्रसिद्ध आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना "तुम्ही आंबे कसे खाता?" असा प्रश्न विचारून ट्रोलिंगला सामोरे गेलेला अक्षय, यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका अनपेक्षित आणि मजेशीर प्रश्नाने गोंधळात टाकताना दिसला.
FICCI Frames 2025 च्या उद्घाटन कार्यक्रमात अक्षय कुमार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात एक छोटासा संवाद रंगला. गप्पांच्या ओघात अक्षयने फडणवीसांना विचारले, "तुम्ही नागपूरचे आहात... संत्री कशी खाता? सोलून का ज्यूस करून?" यावर उपस्थितांनी जोरदार हास्यकल्लोळ केला.
मुख्यमंत्र्यांनीही या प्रश्नाला उत्स्फूर्त आणि खास नागपुरी शैलीत उत्तर दिले. “संत्र्याचे दोन भाग करा, त्यावर थोडं मीठ टाका आणि आंब्यासारखं सरळ खा. नागपूरच्या लोकांची ही खास पद्धत आहे,” असे फडणवीस म्हणाले. यावर अक्षयनेही उत्तर दिलं, "ही पद्धत मी नक्की करून पाहीन."
अक्षय कुमार म्हणाला, "ही माझी दुसरी मुलाखत आहे. पहिल्यांदा मी पंतप्रधान मोदींची मुलाखत घेतली होती. तेव्हा मी त्यांना विचारलं होतं - ‘तुम्ही आंबा कसा खाता?’ आणि त्यावेळी खूप लोकांनी मला ट्रोल केलं. पण मी अजूनही बदललो नाही!”
या गमतीशीर संवादाने कार्यक्रमात उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. दरम्यान, जेव्हा फडणवीस यांना विचारण्यात आले की त्यांच्या राजकीय प्रवासात एखादा प्रेरणादायी चित्रपट आहे का, तेव्हा त्यांनी 'नायक: द रिअल हिरो' या चित्रपटाचा उल्लेख केला.
"हा चित्रपट मला केवळ प्रेरणा देणारा नाही तर अनेकवेळा अडचणीचे कारण ठरला आहे. मी जिथे जातो, लोक मला विचारतात, तुम्ही ‘नायक’ सारखं काम का करत नाहीस? एका दिवसात अनिल कपूरने इतकं काही करून दाखवलं, मग तुम्ही का नाही करू शकत?” असं फडणवीसांनी मिश्कीलपणे सांगितलं.