रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ८ ऑक्टोबर रोजी अवजड वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.
या दिवशी होणाऱ्या विमानतळाच्या भव्य उद्घाटन सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात देशभरातून मान्यवर, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याने वाहतूक व्यवस्थापनासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. सकाळी ६:१० वाजल्यापासून रात्रीपर्यंत ही बंदी लागू राहील, अशी माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे.
पनवेल, रायगड आणि नवी मुंबई परिसरातील नागरिकांना उद्घाटनाच्या दिवशी वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी पर्यायी मार्गांची आखणी केली आहे. अवजड वाहन चालकांनी निर्धारित वेळेत प्रवास टाळावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
वाहतूक पोलिसांनी कार्यक्रमस्थळी आणि आसपासच्या परिसरात विशेष पथके तैनात केली असून, सुरक्षा व शिस्तबद्ध वाहतूक राखण्यासाठी सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे. नागरिकांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.